शिवनेरीवर उत्साहात साजरा झाला शिवजन्मोत्सव सोहळा !

0
IMG-20230219-WA0063

शिवनेरीवर उत्साहात साजरा झाला शिवजन्मोत्सव सोहळा !

पुणे, दि. २० फेब्रुवारी :
छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ राज्याचे नव्हे तर देशाचे, जगाचे आदर्श असून त्यांनी उभारलेले गडकोट, किल्ले आपला इतिहास आणि संपत्ती असल्याने ती जपण्याचे काम योग्यप्रकारे करण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

किल्ले शिवनेरीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा झाला, त्यावेळी ते बोलत होते.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळी येऊन दर्शन घेणे रोमांचक अनुभव आहे, असे सांगून मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महाराष्ट्रात आपला जन्म झाला. आज घराघरात शिवजयंती साजरी होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अलौकीक कार्याची आठवण प्रत्येकाच्या मनात सतत रहाते. त्यांचा आदर्श समोर ठेवून आपण काम करतो. त्यांच्या विचारानुसार राज्य शासन सर्वसामान्य, गोरगरीब आदी सर्व घटकांसाठी काम करीत आहे.

महाराजांचा आदर्श केवळ राज्यासाठी नव्हे तर देशासाठी आवश्यक आहे. त्यामुळे महाराजांनी बाणेदारपणे औरंगजेबाला उत्तर दिले त्या आग्राच्या किल्ल्यात शिवजयंती साजरी होत आहे. राज्य शासन पर्यटन विभागामार्फत शिवनेरीच्या पायथ्याशी हिंदवी स्वराज्य महोत्सव साजरा करीत आहे. शिवनेरी हे जगाचे श्रद्धास्थान आहे.

शक्ती आणि युक्ती ही दोन शस्त्रे महाराजांच्या रणनितीचा भाग होती. त्यातून त्यांनी स्वराज्याची निर्मिती केली. महाराजांनी वयाच्या बाराव्या वर्षी स्वराज्याचे स्वप्न पाहिले, प्रजेचे कल्याण व्हावे यासाठी प्रयत्न केले. रयतेवर त्यांचे जीवापाड प्रेम होते. रयतेच्या रक्षणासाठी, हितासाठी कधी त्यांनी तडजोड केली नाही. दूरदृष्टीने गडकोट बांधले. ते कुशल प्रशासक, संघटक होते. त्यांनी शेती, सिंचन, शिक्षण, भाषा, महसूली, शासन, प्रशासनाच्या अनेक योजना आखल्या. समाजातील प्रत्येक घटकाची काळजी घेतली. त्यांच्या पराक्रमापुढे परकियांच्या माना झुकल्या. पेशावर ते तंजावरपर्यंत छत्रपतींचा भगवा डौलाने फडकला, असा गौरवोद्गार शिंदे यांनी व्यक्त केला.

शिवनेरी परिसराचा विकास आराखडा वेळेत आणि दर्जेदार पूर्ण होईल. गडकिल्ल्यांच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही. वढू, तुळापूरचाही चांगल्या प्रकारे विकास केला जाईल. शिवनेरी येथे शिवप्रभुंचे दर्शन घ्यायला कोणालाही अडथळा, बंदी नसेल शिवजन्मोत्सवाचे अधिक चांगल्या प्रकारे आयोजन करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *