आदित्य ठाकरेंना भाजपाचा कुठलाही कार्यकर्ता हरवेल.
आदित्य ठाकरेंना भाजपाचा कुठलाही कार्यकर्ता हरवेल.
मुंबई, दि. १४ फेब्रुवारी:
महाराष्ट्रात संजय राऊत यांना कोणीही सिरीयसली घेत नाही. आदित्य ठाकरे निवडणुका घेण्याच्या वल्गना करतात मात्र, त्यांना भारतीय जनता पक्षातील कुणीही कार्यकर्ता हरवू शकतो. त्यासाठी मला येण्याची गरज नाही. जे आपली पार्टी सांभाळू शकले नाहीत त्यांच्याविषयी काय बोलायचे ? अश्या शब्दांत केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर चेंबूर येथील पत्रकार परिषदेत निशाणा साधला.
अनुराग ठाकूर म्हणाले, भारतीय जनता पक्षाने नेहमी युतीचा धर्म पाळला आहे. त्याबरोबरच संघटन मजबूत करण्यावरही भर दिला आहे. पंतप्रधान मोदी जागतिक स्तरावर लोकप्रिय नेतृत्व आहे. महाराष्ट्रात शिंदे – फडणवीस सरकार अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करत आहे. सत्ता आमच्यासाठी सेवेचे माध्यम आहे. देशाला तोडण्याचे काम करणाऱ्या विरोधात कारवाई केली आहे. कोरोना काळात मोदींनी अर्थव्यवस्था वाचवण्याचे काम केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यंदाचे शानदार बजेट सादर केले आहे. समाजातील सर्वच घटकांसाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. विकसित भारताची पायाभरणी करणारे यंदाचे बजेट आहे. रेल्वेचे २०१४ च्या तुलनेत नऊपट बजेट वाढले. काँग्रेस सरकारच्या काळात ११७१ करोड महाराष्ट्रासाठी मिळत होते. आज १३ हजार ७०० करोड एका वित्तीय वर्षात महाराष्ट्रासाठी देण्यात येणार आहे. काँग्रेसने दिलेल्या निधीपेक्षा महाराष्ट्राला साडे अकरा पट अधिक हा निधी मिळाला आहे. कोविड काळात लघु उद्योगांना मदत करण्यात आली. त्यामुळे भारताची अर्थव्यवस्था सुरळीत झाली. भारत जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनली आहे. परकीय गुंतवणुकीला प्राधान्य देण्यात आले आहे. शेतकऱ्यांसाठी वरदान ठरतील अश्या योजना येत आहेत. गरिबांना मोफत धान्य पुरवण्याचे काम मोदी सरकारने केले. रस्ते विकासात १४०३ प्रकल्प महाराष्ट्रासाठी मंजूर झाले. महाराष्ट्रातील शहरांसाठी २०१५ पासून १५३६ प्रकल्प मंजूर झाले आहेत. मेट्रोला भरघोस निधी आणि दोन वंदे भारत एक्सप्रेस महाराष्ट्राला दिल्या. महिला आणि युवकांच्या आर्थिक सक्षमकरणासाठी निधीची तरतूद केली आहे. एकूणच सर्वच घटकांच्या विकासाचा विचार मोदी सरकारने केला आहे असेही ते म्हणाले.
