शेतीला आधुनिकतेची जोड देऊन ग्लोबल स्तरावर पोहचवा.

0
IMG-20230212-WA0059

शेतीला आधुनिकतेची जोड देऊन ग्लोबल स्तरावर पोहचवा.

नारायणगाव, दि. १२ फेब्रुवारी:-

आपला देश कृषिप्रधान असून देशाची संपूर्ण अर्थ व्यवस्था ही कृषि क्षेत्रावर निगडित आहे. त्यामुळे कितीही शहरीकरण झाले तरी ग्रामीण भागासाठी विशेषतः शेतीसाठी विशेष निधीची तरतूद करण्याची नितांत आवश्यकता आहे. या क्षेत्राचे प्रश्न सोडविण्यासाठी प्राधान्याने विचार करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केले.

ग्रामोन्नती मंडळ, कृषी विज्ञान केंद्र, नारायणगाव येथे आयोजित ‘ग्लोबल कृषि महोत्सव’, श्रीमती एस. आर. केदारी बालकमंदिर, अण्णासाहेब नवरे तांत्रिक शिक्षण केंद्र नूतन इमारतींचे उद्घाटन, ग्रामोन्नती कृषी सन्मान २०२३ पुरस्कार वितरण सोहळा, शिवजन्मभूमीची आम्रगाथा व आंबा पिक उत्पादक मार्गदर्शिका पुस्तक प्रकाश सोहळा विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजितदादा पवार, राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ व माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी आयोजित कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.

छगन भुजबळ म्हणाले की, मुलांना नावीन्यपूर्ण शिक्षण देण्यासाठी केंद्राच्या वतीने अतिशय काळजी घेण्यात आली आहे. याठिकाणी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आले आहे. सर्व समाजातील बांधवांना शिक्षण मिळालं पाहिजे यासाठी परिसरातील सत्यशोधक समाजातील समाजधुरिनांनी दर्जेदार शिक्षण संस्था उभ्या केल्या असून अनेक विद्यार्थी यातून शिक्षण घेऊन यशस्वी होत आहे. ग्रामोन्नती मंडळ शिक्षण, कृषी क्षेत्रासाठी अतिशय महत्वपूर्ण काम करत आहे. हे अतिशय भूषवाह असून महाराष्ट्रातील आणि देशातील संस्थांना मार्गदर्शक ठरणार आहे असे त्यांनी सांगितले.

नारायणगाव परिसरातील शेतकरी शेती क्षेत्रात नावीन्यपूर्ण प्रयोग करत असून परिसरातील शेतकरी प्रयोगशील बनला आहे. शेतीमध्ये नवनवीन तंत्रज्ञान विकसित करून शेतीला आधुनिकतेची जोड देऊन ती ग्लोबल स्तरावर पोहोचविणे अतिशय आवश्यक आहे. ते काम कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून होत असते. त्यामुळे कृषी प्रदर्शनाचे नियमित आयोजन होणे ही शेतकऱ्यांसाठी तितकेच महत्वाचे आहे. शेती क्षेत्रात शरद पवार यांचा अभ्यास असून कृषी क्षेत्रासाठी अतिशय महत्वाचे योगदान त्यांनी दिलं आहे. त्यामुळे देशाच्या राजकारणातील पवार हे अतिशय श्रेष्ठ व्यक्तिमत्त्व असल्याचे त्यांनी सांगितले.

आपल्या देशातून बांगलादेशात सर्वाधिक द्राक्ष निर्यात होते मात्र सीमा शुल्क वाढविल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारने शेतकरी हिताचे निर्णय घ्यावे अशी टीका त्यांनी केली. देशात विजेचे खाजगीकरण होत असून अदानी सारख्या उद्योजकांना संस्था विकल्या जात आहे. त्यामुळे लवकरच विजेच्या दराचा बोजा तुम्हा आम्हावर पडणार असल्याचे त्यांनी सांगितले.

शेती क्षेत्राकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. देशात शेती क्षेत्राकडे दुर्लक्ष केले तर शेजारच्या श्रीलंका आणि पाकिस्तान प्रमाणे आपल्या देशाची परिस्थिती होऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांना शासनाने अधिक मदत करण्याची गरज असून त्यांच्यासाठी विशेष तरतूद करण्याची आवश्यकता आहे. तसेच देशाच्या शैक्षणिक धोरणात देखील बदल केले जात असून इतिहास बदलण्याचे प्रयत्न केला जात आहे. सद्या सत्ताधारी हे प्रचंड ज्ञानी असून कधी काय वक्तव्य करतील त्यांचा भरोसा नाही अशी मिश्किल टिपनी त्यांनी केले.

आम्ही सत्तेत असताना वीजबिल माफीच्या घोषणा झाल्या. किती शेतकऱ्यांची वीज बिल माफ करण्यात आली. आता मात्र शेतकऱ्यांची वीज बिले वाढीव दराने येत आहेत.येणाऱ्या काळात ही वीज आणखी महागणार आहे याचे कारण अदानी आहे. तुम्हाला जरी वीज MSEB पुरवत असली तरी निर्माण करण्यासाठी लागणारा कोळसा अदानीचा आहे. कोळसा उतरवीणारी जहाजे अदानीची आहेत, जिथे उतरतात ती बंदरे त्याचे आहेत आणि अदानी आत्ता भयंकर तोट्यात आहे. हा तोटा उद्या तुमच्या खिशातून वसूल केला जाईल अशी टीका त्यांनी यावेळी केली.

केंद्र सरकारने संगितले की आम्ही शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान योजना देऊ त्याचे ६ हजार वर्षाला देऊ. अनेक शेतकऱ्यांना मिळाले पण हेच पैसे आता परत घेतले जाणार आहेत. काहीतरी कारण काढून शेतकऱ्यांना अपात्र घोषित केले जात आहे आणि त्यांच्याकडून आता हे पैसे परत घेतले जाणार आहे. नुकसान झाले शेतकऱ्यांचे तर नुकसान भरपाई वेळेवर दिली जात नाही. कृषिप्रधान असलेल्या देशातील शेतकरी उपेक्षित का राहत आहे असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *