अदानी गैरव्यवहारप्रश्नी काँग्रेसचे ९ तारखेला SBI व LIC कार्यालयासमोर आंदोलन!
अदानी गैरव्यवहारप्रश्नी काँग्रेसचे ९ तारखेला SBI व LIC कार्यालयासमोर आंदोलन!
मुंबई, दि. ४ फेब्रुवारी:-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील संपत्ती विकण्याच्या नादात जनतेचा पैसाही अदानीच्या खिशात घातला असून कष्टाने कमावलेला हा पैसा डुबणार नाही यासाठी केंद्र सरकारने ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे. जनतेचा पैसा अदानीच्या विविध कंपन्यात गुंतवण्यास मोदीच जबाबदार असून अदानीच्या गैरकारभाराचा फुगा फुटलेला असतानाही केंद्र सरकार गप्प बसून आहे. ‘अदानी’मधील गैरकारभाराची चौकशी करावी व जनतेचा पैसा सुरक्षित रहावा यासाठी काँग्रेस पक्ष सोमवार दिनांक ६ फेब्रुवारी रोजी एसबीआय व एलआयसीच्या राज्यातील सर्व कार्यालयांसमोर आंदोलन करणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.
यासंदर्भात बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, उद्योगपती गौतम अदानी व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे घनिष्ट संबंध जगजाहीर आहेत. या संबंधातूनच मोदी सरकारने जनतेचा पैसा अदानींच्या उद्योग समुहात कसलाही विचार न करता गुंतवला आहे. विमानतळ, रेल्वे, वीजसेवा, रस्ते, बंदरे, विमा कंपन्या यासह देशातील सर्व महत्वाचे सरकारी उद्योग अदानींच्या घशात घातलेले आहेत. यासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया ही देशातील सर्वात मोठी सरकारी बँक व सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसी मधील जनतेचा पैसाही अदानीच्या खिशात घातला आहे. अदानीच्या गैरकारभाराचा फुगा आता फुटला असून तब्बल ७ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे, हा पैसा जनतेचा आहे. एवढा मोठा घोटाळा होऊनही मोदी सरकार, पंतप्रधान आणि अर्थमंत्री गप्प आहेत हे अतिशय लाजीरवाणे व असंवेनशीलपणाचे लक्षण आहे.
काँग्रेस पक्ष कोणत्याही उद्योगपतीच्या विरोधात नाही पण सर्व नियम, कायदे मोडून एखाद्या उद्योगपतीसाठी रान मोकळे करणे हे देशाच्या हिताचे नाही. राहुल गांधी यांनी सातत्याने अदानीसंदर्भात धोक्याची जाणीव करुन दिली होती. महिनाभरापूर्वीच राहुलजी यांनी अदानीचा फुगा फुटेल असे सांगितले होते तरीही मोदी सरकार जागे झाले नाही, आता घोटाळा उघड झाला आहे. काँग्रेस पक्षासह विरोधपक्ष या घोटाळ्याची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी करण्याची मागणी करत आहेत मात्र मोदी सरकार चौकशीही करत नाही व काही उत्तरही देत नाही.
संसदेत काँग्रेस पक्ष सामान्य जनतेचा पैसा सुरक्षित रहावा यासाठी आवाज उठवत आहेच पण रस्त्यावर उतरुनही जनतेच्या हितासाठी आंदोलन करत आहे. सोमवारी ६ फेब्रुवारी रोजी एलआयसी व स्टेट बँक ऑफ इंडियाच्या राज्यातील सर्व कार्यालयासमोर आंदोलन केले जाणार आहे. या आंदोलनात काँग्रेस पक्षाचे सर्व नेते, माजी मुख्यमंत्री, माजी मंत्री, आमदार, खासदार, विविध सेलचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहतील, असे नाना पटोले म्हणाले.
