बहुजन वर्गाची सेवा करणारा प्रतिभावान बुद्धिवादी नेता काळाच्या पडद्याआड 

0
20230113_092259

बहुजन वर्गाची सेवा करणारा प्रतिभावान बुद्धिवादी नेता काळाच्या पडद्याआड..

नाशिक, दि. १४ जानेवारी :-

जदयुचे माजी अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री शरद यादव यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने बिहारच्या राजकारणावर पकड असलेला ओबीसींच्या प्रश्नांसाठी सतत झटणारा प्रतिभावान बुद्धिवादी नेता कायमचा हरपला आहे, अशा शब्दात राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.

छगन भुजबळ यांनी शोक संदेशात म्हटले आहे की, बिहारच्या राजकारणात ठसा उमटवणाऱ्या शरद यादव यांना समाजवादी राजकारणामुळे विशेष लोकप्रियता मिळाली होती. सन १९७४ मध्ये जबलपूरमधून पहिल्यांदा पाचव्या लोकसभेवर निवडून आल्यानंतर सुमारे ५० वर्षे सार्वजनिक जीवनात काम करून ते सात वेळा लोकसभेचे खासदार आणि चार वेळा राज्यसभेचे खासदार म्हणून काम केलं. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर त्यांनी काम करत बहुजन वर्गाचे सेवा केली. ओबोसी आणि मागास घटकांसाठी त्यांनी केलेल्या कार्याबद्दल त्यांचा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने समता पुरस्काराने गौरव करण्यात आला होता.

यावेळी आपल्या शोकभावना व्यक्त करताना भुजबळ म्हणाले की मंडल आयोग लागू व्हावा यासाठी त्यांनी दिलेल्या योगदानामुळे त्यांना बिहार मध्ये “मंडल मासीहा” म्हंटले जात होते. ओबिसीचे प्रश्न सुटले पाहिजे यासाठी नेहमी अग्रेसर असणारे शरद यादव यांची काही दिवसांपूर्वी दिल्लीतील एका कार्यक्रमात भेट झाली होती. त्यावेळी ते म्हणाले होते की ओबीसींची लढाई भुजबळ देशपातळीवर आता तुम्हाला लढावी लागेल. त्यांचे मार्गदर्शन, पाठींबा नेहमी आमच्यासाठी मोलाचा राहिला आहे.

ज्येष्ठ नेते शरद यादव यांची बिहारच्या राजकारणासोबत देशाच्या राजकारणात विशेष पकड होती. त्यांच्या निधनाने बिहारसह देशातील राजकीय सामाजिक क्षेत्राची कधीही न भरून निघणारी हानी झाली आहे. मी व माझे कुटुंबीय शरद यादव कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असून ईश्वर मृताच्या आत्म्यास चिरशांती देवो हीच प्रार्थना करतो असे छगन भुजबळ यांनी शोकसंदेशात शेवटी म्हंटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *