शैक्षणिक वर्ष १ ऑगस्ट पासून सुरू करण्यासाठी नियोजन करा.
शैक्षणिक वर्ष १ ऑगस्ट पासून सुरू करण्यासाठी नियोजन करा.
मुंबई, दि. ६ जानेवारी :
विद्यापीठ आणि महाविद्यालयाचे परीक्षा वेळापत्रक, परीक्षेचे निकाल वेळेत जाहीर करणे, सीईटी प्रवेश प्रक्रिया आणि निकाल ही प्रक्रिया वेळेत पूर्ण करून शैक्षणिक वर्ष वेळेत सुरू होणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्व विद्यापीठाने नियोजन करावे, अशा सूचना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्या.
पाटील म्हणाले, राज्यातील विद्यापीठ आणि महाविद्यालयांच्या परीक्षा ३१ मे पर्यत कशा पूर्ण होतील याचे नियोजन करून ३० जूनपर्यंत निकाल जाहीर करावेत. जुन-जुलै मध्ये सीईटी परीक्षा, निकाल आणि प्रवेश प्रक्रिया पूर्ण करून १ ऑगस्ट पासून शैक्षणिक वर्ष सुरू करण्यासाठी वेळापत्रकाचे नियोजन करावे. विद्यार्थी हितासाठी शैक्षणिक वेळापत्रकाचे नियोजन करावे.त्यामुळे विद्यार्थ्यांना राज्याबाहेर आणि देशाबाहेर असलेल्या उच्च व तंत्र शिक्षणाच्या संधी अधिक उपलब्ध होण्यास मदत होईल आणि विद्यार्थ्यांचा मानसिक त्रासही कमी होईल.
विद्यापीठ आणि महाविद्यालयांनी नॅक मूल्यांकन केलेच पाहिजे. ज्या महाविद्यालयांना पाच वर्षापेक्षा अधिक काळ झालेला आहे. त्यांनी नॅक मूल्यांकन प्रक्रिया केली नसेल तर अशा महाविद्यालयाचे प्रथम वर्ष प्रवेश बंद करण्यात येथील. नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीमध्ये अधिकाधिक स्पष्टता आणून येत्या शैक्षणिक वर्षांपासून अंमलबजावणीला गती द्यावी.
उच्च शिक्षणामध्ये विद्यार्थी संख्या विशेषत: महिलांची संख्या वाढविण्यासाठी विद्यापीठाने प्रयत्न करावेत. यासाठी आवश्यक शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासन सहकार्य करेल असेही पाटील यांनी सांगितले.
या बैठकीत उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रस्तोगी यांनी शैक्षणिक गुणवत्ता आणि सद्य:स्थितीचे सादरीकरण केले. नवीन शैक्षणिक धोरणानुसार व्यावसायिक अभ्यासक्रम, पुस्तक, शैक्षणिक साहित्य मराठीमध्ये उपलब्ध होण्यासाठी आयआयटी मुंबईच्या ‘उडाण’ प्रकल्पाबाबत उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि आयआयटी मुंबई यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे.
