हिवाळी अधिवेशनात सरकारने विदर्भाला काय दिले ?
हिवाळी अधिवेशनात सरकारने विदर्भाला काय दिले ?
नागपूर, दि. २९ डिसेंबर :
विदर्भाच्या विकासाशिवाय महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास पूर्ण होऊ शकत नाही हे सांगतांना धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 15 हजार रुपये बोनस देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केली. कृषी, जलसंपदा, उद्योग, वस्त्रोद्योग, पर्यटन अशा विविध क्षेत्रात विदर्भासाठी भरीव तरतूद करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.
विधानसभेत २९३ अन्वये प्रस्तावाला उत्तर देतांना मुख्यमंत्र्यांनी विदर्भासाठी पर्यटन सर्किट, नवीन खनिज धोरण, समतोल प्रादेशिक विकासासाठी नवीन समिती अशा विविध घोषणा केल्या. विरोधी पक्ष तसेच सत्ताधारी पक्षाकडून सदस्यांनी मांडलेले मुद्दे आणि सूचनांच्या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांनी विविध क्षेत्रनिहाय विदर्भाचा कसा विकास करण्यात येईल ते सांगितले.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, विदर्भाच्या प्रश्नांवर सत्ताधारी असोत किंवा विरोधक, आपण एकत्र येऊन त्यावर ठोस आणि कालबद्ध पावले टाकू. कोविड परिस्थितीमुळे दोन वर्षानंतर हे अधिवेशन होते आहे. नागपूर ही केवळ राज्याची उपराजधानी नाही तर राज्याच्या प्रगती आणि विकासात खूप महत्वाचे योगदान देणारा जिल्हा म्हणून नागपूरची नवी ओळख निर्माण झाली आहे. आमच्या युती सरकारला सहा महिने पूर्ण होताहेत. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री म्हणून मलाही विदर्भासाठी काहीतरी भरीव करण्याची संधी मिळतेय याचा आनंद आहे. विदर्भ मजबूत, तर राज्य मजबूत, अशी आमची भावना आहे. विदर्भाच्या संपूर्ण विकासाशिवाय महाराष्ट्राचा विकास पूर्ण होऊ शकत नाही. देशासाठी महाराष्ट्र जसा महत्वाचा तसा महाराष्ट्रासाठी विदर्भ महत्वाचा.आणि म्हणूनच आम्ही गेल्या सहा महिन्यात विविध निर्णय घेतांना, राज्यातल्या विदर्भ, मराठवाड्यासारख्या अविकसित प्रदेशाचा विकास हा केंद्रस्थानी मानला आहे. अर्थातच उपराजधानी नागपूरला राजधानी मुंबईशी जोडणारा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग सुरु करून आम्ही उद्याच्या उज्वल भवितव्याचा महामार्ग खुला केला आहे.’
‘महाराष्ट्राने विदर्भाचा नेहमीच सन्मान केला आहे. विदर्भाच्या भूमीभोवती आर्थिक अनुशेषाची आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्त्येच्या दुःखाची काळी किनार आहे. तरीही या परिसरात आत्मविश्वास आहे. शेतकऱ्यांना आधार देण्याची गरज आहे. विदर्भाविषयी आमच्या सरकारमध्ये अपार आदराची भावना आहे. विदर्भाला न्याय दिल्या पाहिजे. त्यामुळे विदर्भाचा विकास हे आमच्या सरकारचे परम कर्तव्य आहे आणि ते आम्ही पार पाडणारच, असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.
