पुणे शिवाजीनगर कोविड रुग्णालयाचे लोकार्पण..
पुणे, दि.23 ऑगस्ट…
कोरोनाबाधित रुग्णांवर उपचारासाठी सुविधांची उभारणी राज्यभर सुरु असून पावसाळा, कोरोनाचा प्रादुर्भाव आणि सणवार एकत्र आल्याने अधिक काळजी घेण्याची गरज असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. संपूर्ण गणेशोत्सव काळात गर्दी होणार नाही, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही याची प्रत्येकाने दक्षता घ्यावी, असे आवाहन करतानाच गाफील न राहता आतापर्यंत आपण जी काळजी घेतो आहोत तीच पुढेही घ्यावी, असे आवाहनही मुख्यमंत्री ठाकरे यांनी केले. सोबतच पुणेकरांना निरोगी आरोग्य लाभू दे, अशी प्रार्थनाही त्यांनी केली.
शिवाजीनगर येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या (सीओईपी) परिसरात कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी उभारण्यात आलेल्या कोविड रुग्णालयाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन लोकार्पण झाले.
कोरोनामुळे सर्वधर्मियांनी आतापर्यंतचे सगळे सण साधेपणाने घरातच साजरे करून शासनाला सहकार्य केल्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले. ते म्हणाले, पुणे शहरातील गणेशोत्सव पाहण्यासाठी परदेशातून नागरिक येत असतात, श्री गणेशाची प्रतिष्ठापना आपण दरवर्षीप्रमाणे यंदाही केली आहे, मात्र यावेळेस आपल्यासमोर कोरोनाचे विघ्न आहे. या विघ्नातून लवकरात लवकर मुक्ती मिळावी तसेच सामाजिक भान ठेऊन शांततेत यंदाचा गणेशोत्सव आपण साजरा करूया, अशी अपेक्षा व्यक्त करून मुख्यमंत्री ठाकरे यांनी संपूर्ण गणेशोत्सव काळात गर्दी होणार नाही, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही याची प्रत्येकाने काळजी घ्यावी असे आवाहन करतानाच कोणीही गाफील न राहता आतापर्यंत आपण जी काळजी घेतो आहोत, तीच पुढेही घेणे आवश्यक आहे तसेच मास्कचा नियमित वापर करावा, वारंवार हात धुणे, वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छता तसेच सुरक्षित अंतर यावर भर देणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.
पुणे येथे कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्सासाठी जम्बो रुग्णालयाची अत्यंत कमी कालावधीत उभारणी केली, ही उल्लेखनीय बाब आहे. पुण्यातील या कोविड रुग्णालयामध्ये अद्ययावत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, कोरोनाची एक लाट ओसरल्यानंतर दुसरी लाट येते हा जगभरातील अनुभव आहे, त्यावरून आपण गाफील राहून चालणार नाही, त्यासाठीच अधिकच्या सुविधांची उभारणी करण्यात येत असल्याचे सांगून पुणेकरांना निरोगी आरोग्य लाभू दे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. लॉकडाऊन नंतर आपण काही गोष्टींमध्ये शिथिलता दिली. दैनंदिन व्यवहार सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरु आहे. मात्र, यामुळे गाफील राहून चालणार नाही. कायम सतर्क राहावे लागणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काटेकोर नियोजन करुन आणि नागरिकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
