‘त्या’ शब्दाबद्दल जाहीर माफी मागतो आता विषय थांबवा !
‘त्या’ शब्दाबद्दल जाहीर माफी मागतो आता विषय थांबवा !
मुंबई, दि. १३ डिसेंबर
महात्मा जोतीबा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शाळा उभ्या करताना भीक मागितली असे म्हणून वाद निर्माण करणाऱ्या उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकात पाटील यांनी आता हा विषय थांबवा अशी विनंती केली आहे. कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर जाहिर माफी मागतो. माझ्या दृष्टीने ह्या वादावर मी पडदा टाकत आहे, आता हा वाद थांबवावा अशी विनंती त्यांनी केली आहे.
चंद्रकांत पाटील यांनी जाहिर केलेल्या पत्रात असे म्हटले आहे की, “महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, बहुजन समाजाचे उध्दारकर्ते, महात्मा ज्योतिबा फुले, प्रज्ञासुर्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पवित्र स्मृतीस आणि त्यांच्या अनुकरणीय कृतीस मी सदैव वंदन करत आलो आहे. माझ्या कृतीत त्यांचे अनुकरण करत आलो आहे. त्यांच्या महान कार्याविषयी मला मनापासून आदर आहे. त्यांच्याविषयी बोलताना माझ्याकडून बोली भाषेतील शब्द अनवधानाने निघाले, यात मला कोणालाही दुखवायचा हेतू नव्हता. त्या शब्दाबद्दल मी दिलगिरी व्यक्त केलीच आहे पण त्यावरून घडलेल्या घटना माझ्या मनाला क्लेशदायक ठरल्या आहेत.
शिवरायांच्या एका मावळ्यावर असे आरोप लावले जावेत याचे वाईट वाटत आहे. या मुद्द्यावरून महाराष्ट्र अशांत होऊ नये असे मला वाटते.मी पुन्हा एकदा ह्या विषयात कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर जाहिर माफी मागतो. माझी कोणाविषयी कोणतीही तक्रार नाही. तसेच ज्या कोणाला कायद्यान्वये अटक करण्यात आली आहे त्यांची मुक्तता करावी, ज्या पोलिस अधिकाऱ्यांवर व पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे ती ही मागे घ्यावी. तसेच पत्रकारांवर कारवाई करण्यात आली असल्यास तीही मागे घ्यावी, अशी सूचना करतो आहे.
माझ्या तोंडावर ज्यांनी शाईफेक केली त्यांच्याबद्दल मला काहीही म्हणायचे नाही. माझ्यादृष्टीने ह्या वादावर मी पडदा टाकत आहे..आता हा वाद थांबवावा ही विनंती.
