महापुरुषांबद्दल भाजपा नेत्यांचे खायचे व दाखवायचे दात वेगळे !
महापुरुषांबद्दल भाजपा नेत्यांचे खायचे व दाखवायचे दात वेगळे !
मुंबई, दि. १३ डिसेंबर:
निवडणुकीच्यावेळी महापुरुषांचे आशिर्वाद घेऊन मतांची भीक मागणारे भारतीय जनता पक्षाचे नेते निवडणुका संपल्यानंतर मात्र याच महापुरुषांचा अपमान करतात. महाराष्ट्रात राहूनच महाराष्ट्रातील महापुरुषांचा अपमान करण्यात भाजपा नेत्यांमध्येच स्पर्धा लागल्याचे दिसत आहे. महापुरुषांचा अपमान करणाऱ्या या नेत्यांवर भाजपाने कारवाई केली नाहीच पण साधा निषेध करण्याचे अथवा समज देण्याचे सौजन्यही दाखवले नाही. भाजपाचे महापुरुषांच्याबाबत खायचे व दाखवायचे दात वेगळे आहेत, हेच यातून दिसत आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.
यासंदर्भात बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांचा अपमान केला, सुधांशु त्रिवेदी या प्रवक्त्यानेही अपमान करणारे वक्तव्य केले तर पर्यटनमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी शिवाजी महाराजांच्या आग्रा सुटकेची तुलना राजकीय बंडखोरांशी केली. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी महाराजांचा एकेरी उल्लेख केला. सातत्याने छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले यांचा अपमान केला जात आहे. जनतेतून त्यावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे परंतु भारतीय जनता पक्षाने या नेत्यांवर कारवाई केली नाही उलट या नेत्यांचा भक्कमपणे बचाव केला. भारतीय जनता पक्षाचे नेते निर्ढावलेले आहेत, महापुरुषांबद्दल बोलताना ते कोणताही विधिनिषेध पाळत नाहीतच पण महापुरुषांचा अपमान करण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे आणि त्याचे त्यांना काहीही वाटत नाही.
महापुरुषांचा अपमान करणाऱ्या राज्यपाल कोश्यारी यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नागपूरमधील कार्यक्रमात शेजारी सन्मानाने बसवले. महापुरुषांचा अपमान करणाऱ्याला पंतप्रधान मोदींनी चार खडेबोल सुनावले असते तर पंतप्रधानांबद्दल आम्हाला आदरच वाटला असता पण महापुरुषांपेक्षा भाजपाला त्यांचे नेते मोठे वाटतात असेच खेदाने म्हणावे लागत आहे. महापुरुषांची बदनामी करण्याचे हे भाजपचे नियोजित षडयंत्र असून महापुरुषांची बदनामी करण्याचा भाजपचा अजेंडा राज्यपाल चालवत आहेत.
