चंद्रकांतदादांनी ‘तो’ शब्द मागे घेऊन दिलगिरी व्यक्त करावी…
चंद्रकांतदादांनी ‘तो’ शब्द मागे घेऊन दिलगिरी व्यक्त करावी…
मुंबई दि. ११ डिसेंबर : –
राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे मोठे नेते आहेत. शासनाच्या अनुदानाविना लोकांच्या मदतीने शिक्षणसंस्था चालविण्याबाबत वक्तव्य करताना महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतीबा, फुले, कर्मवीर भाऊराव पाटील यांचे उदाहरण देऊन भीक या शब्दाचा केलेला वापर अत्यंत चुकीचा आहे. सामाजिक क्रांती करणाऱ्या महापुरुषांचा अवमान आहे. चंद्रकांत पाटील यांच्या सारख्या नेत्यांकडून ही अपेक्षा नव्हती, त्यामुळे चंद्रकांतदादांनी आपले शब्द मागे घ्यावेत व समाजाप्रती दिलगिरी व्यक्त करावी असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.
तू मागू नकोस भीक .. तू शीक असाच संदेश महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा होता. त्यामुळे नोकरी करून शिकता येईल यासाठी सकाळी लवकर सुरू होणारे महाविद्यालय डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केले. दलितमुक्तीचा, सामाजिक दास्यमुक्तीचा लढा महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी उभारला. त्यांचे जीवन आणि समग्र कार्य हे स्वाभिमानावर आधारलेले आणि स्वाभिमानाची शिकवण देणारे आहे. त्यामुळे चंद्रकांतदादांनी भीक हा केलेला शब्दप्रयोग अत्यंत चुकीचा आहे. लोकांच्या मदतीने शिक्षण संस्था चालविल्या हा शब्द वापरला असता तरी चालले असते मात्र भीक मागून शाळा चालविल्या हा शब्द अपमान करणारा आहे. तो शब्द मागे घेऊन दिलगिरी व्यक्त करून वादावर पडदा टाकावा असे आवाहन रामदास आठवले यांनी केले.
पिंपरी चिंचवडमध्ये झालेला शाई हल्ला योग्य नाही. शांततापूर्ण मार्गाने निषेध करावा. वैचारिक विरोध जरूर करावा मात्र हिंसक मार्ग कोणी स्वीकारू नये. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी अहिंसेच्या मार्गाने आपला लढा लढला आहे. त्यामुळे चंद्रकांत दादांवर झालेला शाई फेकीचा प्रकार चूकीचा आहे असे रामदास आठवले यांनी आपले मत व्यक्त केले असून आंबेडकरी जनतेने संयम आणि शांतता बाळगावी असे आवाहनही आठवले यांनी केले आहे.
