संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात गुजरातमधील सिंहाची जोडी..
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात गुजरातमधील सिंहाची जोडी..
मुंबई, दि. ७ डिसेंबर :
भारताचे राष्ट्रीय प्रतीक असलेला सिंह आमचा अभिमान आहे अशोक स्तंभावर सिंह आहे, पराक्रमाचे प्रतिक सिंह आहे. जंगलाचा हा राजा राज्यातील वनांच्या सानिध्यात राहावा यासाठी पुढाकार घेतला असून सिंहांची जोडी उद्यानात सोडताना अतिशय आनंद होत असून वन्यजीव व पर्यावरण संवर्धन हे ईश्वरीय कार्य आहे असे उद्गार वन व सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काढले.
गुजरात येथुन आणलेली सिंहांची जोडी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील अधिवासात मुक्त करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.
वनग्रंथालयाचे भूमीपूजन आणि सर्वांत लहान दुर्मीळ प्रजातीच्या वाघाटी मांजर (रस्टी स्पॉटेड कॅट) संवर्धन केंद्राचे उद्घाटन यावेळी मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर खासदार गोपाल शेट्टी, आमदार प्रवीण दरेकर, प्रधान मुख्य वनसंरक्षक महिप गुप्ता, सतीश वाघ, आमदार प्रकाश वाघ, प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे संचालक मल्लिकर्जुन, क्लामेंन्ट बेन उपस्थित होते.
आपल्या भाषणादरम्यान मुनगंटीवार म्हणाले कि, संजय गांधी उद्यानात मुक्त करण्यात आलेल्या सिंहांना भारतीय स्टेट बँकेने दत्तक घेतले याचे मनापासून कौतुक करावेसे वाटते. वनांचे काम मनापासून करा, हे ईश्वरीय कार्य आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान ईश्वराची देण आहे. वसुंधरा म्हणजे पृथ्वीच्या जडणघडणीत देवाने आर्किटेक्ट म्हणून भूमिका निभावली, त्या अमूल्य वसुंधरेच्या संवर्धनाची जबाबदारी सारे मिळून सांभाळू या.
संजय गांधी उद्यानातील सर्वांत लहान दुर्मीळ प्रजातीच्या वाघाटी मांजराचे (रस्टी स्पॉटेड कॅट) संवर्धन केंद्र हे देशातील एकमेव संवर्धन केंद्र आहे, ते देखील आपण जपू या असे ते म्हणाले.
यावेळी बोलताना आमदार प्रवीण दरेकर यांनी वन ग्रंथालय संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या वैभवात भर घालेल, असे मत व्यक्त केले. सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्याचे कौतुक करताना ते म्हणाले की सुधीर मुनगंटीवार दूरदृष्टी असणारे महाराष्ट्रातील नेते आहेत. त्यांच्या पूर्वीच्या व आताच्या मंत्रिपदाच्या कार्यकाळात महाराष्ट्र चौफेर प्रगती करत आहे.
खासदार शेट्टी यांनी मंत्रिपदाच्या दुसऱ्या टर्ममध्ये
सुधीरभाऊंनी कामाचा झंझावात कायम ठेवला. हा झंझावात नुसता कायम ठेवला नाही तर तो दुपटीने वाढविला, बोरीवली येथील जागतिक दर्जाच्या राष्ट्रीय उद्यानाच्या वैभवात मुनगंटीवार यांनी भर घातली. या उद्यानाकडे पर्यटकांचा ओढा वाढावा, यासाठी उपाय करण्याची मागणी त्यांनी केली. मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात राज्याचा वनविभाग उत्कृष्ट प्रगती करेल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.
