तुम्ही आमची बदनामी थांबवा आम्ही भाजपा आरएसएसचे ‘सत्य’ सांगणे बंद करु !
तुम्ही आमची बदनामी थांबवा आम्ही भाजपा आरएसएसचे ‘सत्य’ सांगणे बंद करु !
जळगाव जामोद दि. 20 नोव्हेंबर :
भारत जोडो यात्रेला महाराष्ट्रातून चांगला प्रतिसाद मिळाला असून या पदयात्रेमुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नवी उर्जा, नवा उत्साह, नवा जोश निर्माण झाला असून काँग्रेस पक्ष महाराष्ट्रात आगामी काळात चांगली कामगिरी करेल व काँग्रेस पक्षाचे नवे रुप यापुढे दिसेल. भाजपाला जनता कंटाळली असून त्यांना पर्याय हवा आहे आणि काँग्रेसच योग्य पर्याय आहे याची जनतेला खात्री आहे. या पदयात्रेत महाविकास आघाडीचे घटक पक्ष शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सहभागी झाले, त्यांचे आभार. पदयात्रेत महिला व तरुणांचा सहभाग वाखाणण्याजोगा होता असे <span;>अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मीडिया विभागाचे अध्यक्ष जयराम रमेश म्हणाले.
पत्रकारांच्या एका प्रश्नाला उत्तर देताना जयराम रमेश म्हणाले की, भारतीय जनता पक्ष ज्या दिवशी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांची बदनामी करणे थांबवतील त्या दिवशी आम्हीही आरएसएस व भाजपाबद्दल ‘सत्य’ सांगण्याचे बंद करू.
विधिमंडळ काँग्रेस पक्षनेते तथा भारत जोडो यात्रेचे राज्य समन्वयक बाळासाहेब थोरात म्हणाले की, भारत जोडो यात्रा हा आपल्या सर्वांसाठी एक ऐतिहासिक व अविस्मरणीय क्षण ठरला आहे. लोकशाहीतील स्तंभ डळमळीत होत असताना ते मजबूत रहावेत यासाठी ही पदयात्रा काढण्यात आलेली आहे. याबरोबर जनतेच्या मुलभूत प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम झाले. महागाई, बेरोजगारी याकडे सरकारचे लक्ष वेधण्याचे काम केले. बेरोजगारीमुळे तरुणांमध्ये नैराश्य असल्याचे दिसले, हे वातावरण बदलले पाहिजे यासाठी जनजागृती करण्यात आली. महाराष्ट्रातील जनतेने पदयात्रेचे उस्फूर्त स्वागत केले. तसेच राज्याच्या काना-कोपऱ्यातून विविध सांस्कृतीचे दर्शन दररोज घडले. शेगावची सभा हा पदयात्रेतील परमोच्च क्षण ठरला, अपेक्षेपेक्षा जास्त लोकांनी सभेला उपस्थिती लावली.
पदयात्रेत विविध सामाजिक संस्था व संघटनांनी सहभाग घेतला त्यात ‘लोकायत’ या संस्थेने भारत जोडो यात्रा कशासाठी आहे, याविषयाची पत्रके वाटून जनजागृती करण्याचे काम केले. पदयात्रा पुढे निघून गेल्यानंतर मागे पडलेला कचरा, पाण्याचा बाटल्या उचलून रस्ता स्वच्छ करण्याचे काम प्रदेश काँग्रेसच्या पर्यावरण विभागाने केले. ही दोन्ही कार्य उल्लेखनीय आहेत. जनतेने दिलेल्या प्रतिसादाबद्दल थोरात यांनी आभार व्यक्त केले.
या पत्रकार परिषदेला अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मीडिया विभागाचे अध्यक्ष जयराम रमेश, प्रभारी, एच. के. पाटील, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे आदी उपस्थित होते.
