उद्योग विभागाची महिनाभरात श्वेतपत्रिका काढणार
उद्योग विभागाची महिनाभरात श्वेतपत्रिका काढणारः
मुंबई, दि. २ नोव्हेंबर:
विरोधकांकडून मागील पंधरा दिवसांपासून उद्योग विभागाची जाणीवपूर्वक बदनामी केली जात आहे. मागील अडीच वर्षांत उद्योग विभागाने किती विदेशी कंपन्यांसोबत करार केले? किती गुंतवणूक आणली? किती बैठका घेतल्या? याची माहिती राज्यातील जनतेसमोर यावी यासाठी महिनाभरात श्वेतपत्रिका काढणार असल्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केले.
सामंत म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून विरोधकांकडून वेदांताविषयी खोट्या बातम्या पसरवण्याचे काम सुरू आहे. तत्कालीन सरकारने मोठा गाजावाजा करत प्रकल्प आणल्याची प्रसिद्धी केली. परंतु त्याची अमंबलबजावणी का झाली नाही? १४ महिन्यांत एकही कॅबिनेट सब कमिटीची बैठक का झाली नाही? सिनार्मस कंपनी रायगड जिल्ह्यात २० हजार कोटींची गुंतवणूक करणार होती. परंतु सब कमिटीची बैठक न झाल्याने हा प्रकल्प परत नेत असल्याचे कंपनीने सांगतिले आहे. जागा आणि रस्त्याचा प्रश्न जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत आम्ही प्रकल्प सुरू करणार नाही, अशी कंपनीची भूमिका होती. टाटा एअरबस कंपनीबाबत असेच झाले आहे. उद्योग विभागाने एअरबसबाबत कुठलाही पत्रव्यवहार केला नाही. त्याबाबतचे एखादे पत्र लिहिलेले असेल तर ते दाखवावे. तत्कालिन सरकारने केंद्र सरकारला किती पत्र पाठवली हे सांगावे. मागील अडीच वर्षांत किती गुंतवणूक करार झाले, त्याची सद्यस्थिती काय आहे, आदीबाबत श्वेतपत्रिका काढण्यात येणार असल्याचे सामंत यांनी स्पष्ट केले.
श्वेतपत्रिकेत राज्य शासन, उद्योग विभाग, एमआयडीसी यांनी किती देश-विदेशातील कंपन्यांसोबत पत्रव्यवहार केले. किती गुंतवणूक आणली. कोणते प्रकल्प कशामुळे इतर राज्यात गेले, दावोस मधील गुंतवणूक करार आदींची माहिती असेल. यासोबत 20 अब्ज डॉलर्सच्या वेदांत-फॉक्सकॉन सेमीकंडक्टर प्रकल्प, 22,000 कोटी रुपयांचा टाटा एअरबस डिफेन्स ट्रान्सपोर्ट प्लेन प्रकल्प, बल्क ड्रग प्रकल्प, वैद्यकीय प्रकल्प याबाबतच्या मागील सरकारच्या एकूण भूमिकेचा या श्वेतपत्रिकेत समावेश केला जाईल, असेही सामंत यांनी स्पष्ट केले.
सामंत यांनी वेदांत-फॉक्सकॉन आणि गुजरात सरकार यांच्यातील सामंजस्य कराराबाबत माहिती अधिकारात मिळालेली माहिती आणि शेजारच्या राज्यासह टाटा एअरबस प्रकल्पाशी संबंधित दस्तऐवज जारी केले. तीन लाख कोटींच्या रिफायरी प्रकल्पाला विरोध करणाऱ्या विरोधकांनी रिफायनरीबाबत आज आपली काय भूमिका आहे, स्थानिक बेरोगार, तसेच उद्योजकांविषयी काय भूमिका आहे हेही सष्ट करावे, असे आवाहन श्री. सामंत यांनी केले. राजकारण करण्यापेक्षा विरोधकांनी भूमिका स्पष्ट करावी. महाराष्ट्रात उद्योग येतील, यासाठी भूमिका घेतली पाहीजे. उद्योग जाण्यामागे मोठे षडयंत्र आहे. ही युवा पिढीची फसवणूक आहे. उद्योगाबाबतची वस्तुस्थिती मांडण्यासाठी अजित पवार, शरद पवार, राज ठाकरे यांची भेट घेऊन त्यांचा गैरसमज दूर करण्यात येईल. ज्यांना ज्यांना उद्योग खात्याचे पेपर पाहण्याची इच्छा आहे. त्यांना पेपर दाखवण्यात येईल. सर्वांना भेटून वस्तुस्थिती सांगितली जाईल, असेही सावंत यांनी स्पष्ट केले.
