नाशिक-मुंबई महामार्ग ६ नोव्हेंबरपर्यंत खड्डेमुक्त करू; आंदोलन करू नका

0
भुजबळ

नाशिक-मुंबई महामार्ग ६ नोव्हेंबरपर्यंत खड्डेमुक्त करू; आंदोलन करू नका..

नाशिक, दि. १ नोव्हेंबर:-

नाशिक मुंबई रस्ता ६ नोव्हेंबरपर्यंत संपूर्णपणे खड्डेमुक्त करण्यात येईल, तोपर्यंत आंदोलन करू नये अशी विनंती नॅशनल हायवे प्राधिकरणचे प्रकल्प संचालक साळुंखे यांनी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्याकडे केली. त्यानुसार छगन भुजबळ यांनी ही विनंती मान्य करत आंदोलन न करण्याचा निर्णय घेतला आहे.

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी गेल्या आठवड्यात नॅशनल हायवे प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांसमवेत नाशिक ते पडघा दरम्यान रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी केली होती त्यानंतर ३१ ऑक्टोबरपर्यंत रस्त्याची दुरुस्ती करा अन्यथा १ नोव्हेंबरपासून टोलबंद आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. तेव्हापासून माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या कार्यालयाकडून सातत्याने रस्त्याच्या कामाबाबत पाठपुरावा सुरु होता. तसेच दैनदिन झालेल्या कामाचा आढावा घेण्यात येत होता. पदाधिकाऱ्यांनी स्वतः या रस्त्याची पाहणी केली. त्यानंतर पुन्हा भुजबळ फार्म येथील अधिकाऱ्यांसमवेत कामाचा आढावा घेतला.

पाऊस आणि दिवाळीच्या सुट्टीमुळे कामगार नसल्याने तसेच डांबर प्रकल्प बंद असल्याने काम करता आले नाही. दिवाळीनंतर पुन्हा काम सुरु करण्यात आलेले आहे. त्यामुळे आम्हाला अजून पाच ते सहा दिवसांचा वेळ मिळावा. त्यानुसार ६ नोव्हेंबरपर्यंत मुंबई नाशिक रस्ता पूर्ण खड्डेमुक्त करू असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले.

टोल नाक्यांवर वसुली करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून नागरिकांना अरेरावी करण्यात येते यातून अनेक वाद होत आहेत. वारंवार होत असलेल्या या अनुचित प्रकारांना आळा घालण्यात येऊन सबंधित कर्मचाऱ्यांना याबाबत सूचना देण्यात याव्यात असे छगन भुजबळ यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. कुठलाही अनुचित प्रकार यापुढे होणार नाही याबाबत आवश्यक ती कार्यवाही करू असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले.

टोल नाक्यावर टोल वसुली करतांना वाहनांच्या रांगा लागत असून नागरिकांना अनेक वेळ ताटकळत रहावे लागत आहे. याबाबत नागरिकांच्या तक्रारी प्राप्त होत आहे. यासाठी अधिकाऱ्यांनी यावर तातडीने कार्यवाही करत टोल चालकांना सूचना कराव्यात. तसेच पाच मिनिटांहून अधिक वेळ वाहनांच्या रांगा लागल्यास तात्काळ वाहने सोडण्यात यावी अशा सूचना छगन भुजबळ यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. यावर टोल चालकांना याबाबत पत्रक काढून सूचना देण्यात येतील अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *