20200820_185923

मुंबई, दि. २० ऑगस्ट २०२०

अग्गंबाई, सासूबाई…..ही झी मराठीवरील सिरीयल तुमच्यापैकी अनेकजण पाहत असतीलच. या सिरीयलमधला ‘बबड्या’ मात्र सर्वांच्या डोक्यात गेला आहे. भोळी भाबडी आई आसावरीचा तो गैरफायदा घेऊन तीला प्रचंड मनस्ताप देतोच वरून  सुंदर, सुशिल, समजुतदार आणि हो नोकरी करणारी ‘शुभ्रा’ सारखी बायकी असूनही हा ‘बबड्या’ काही सुधरायला तयार नाही.

या ‘कोंबडीच्या’ने घरातच नाही तर अख्या सोसायटीत नाव बदनाम करुन ठेवलंय. बिच्च्यारी आई ‘आसावरी’ असं काहीजण म्हणत ‘बबड्या’ला शिव्या घालतात, पण प्रत्येक आईला आपला मुलगा हा असा ‘बबड्या’ असावा असे नक्कीच वाटणार नाही…..खरं का नाही ? अहो, आळशी, आईतखाऊ, सतत लबाड बोलणारा, लफडी करणारा, कोणाचेच चांगले न ऐकणारा असा ‘बबड्या’ कोणाला आवडेल ?…नाही ना आवडणार…?

पण हा ‘बबड्या’ चांगला मुलगा आहे असे महाराष्ट्र पोलीसच म्हणतात.. आता पोलीस आणि या वाह्यात ‘बबड्या’ला चांगला कसा काय म्हणतील? त्यांनी तर या वात्रट कार्ट्याला धू धू धुतला असता ना?…तर मंडळी, त्याचे असे आहे की, पोलीसांनी त्यांच्या ट्वीटरवर या ‘बबड्या’चा फोटो शेअर करत तो सुधारलाय, ‘बबड्या’ चांगला आहे असे म्हणत मास्क घातलेला फोटो शेअर केला आहे…आलं का नाही तुमच्या लक्षात…नाही आले !! त्याचे असे आहे की, महाराष्ट्र पोलीस समाजप्रबोधन करण्यासाठी सिनेमातील फेमस डायलॉग, गाणी, एखादं कॅरेक्टर याचा उत्तम उपयोग करून घेतात. याच समाज प्रबोधनाचा एक भाग म्हणून महाराष्ट्र पोलिसांनी कोरोना संदर्भात जनजागृती करण्यासाठी आणि खास करुन जे लोक मास्क वापरत नाहीत त्यांना संदेश देण्यासाठी ‘कहानी मे ट्विस्ट’ करत अत्यंत बिघडलेलं हे वात्रट कार्टं ‘बबड्या’ जर बदलू शकतो तर तुम्ही का बदलू शकत नाही, असा संदेश दिलेला आहे.

महाराष्ट्र पोलिसांनी असा शालजोडीतून हाणल्यानंतर तर मास्क न लावणारे, सोशल डिस्टन्स न ठेवणारे, कोरोना पसरू नये यासाठी दक्षता घेत नसलेले, असे ‘बबड्या’ यातून काहीतरी बोध घेतील अशी भाबडी आशा आपण बाळगू यात…

महाराष्ट्र पोलिसांच्या या कल्पकतेला एक कडक सॅल्यूट तर बनतो ना राव!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *