आपला स्वाभिमान जपू आणि 2024 ला ताकद दाखवू

0
20221005_210923

आपला स्वाभिमान जपू आणि 2024 ला ताकद दाखवू…

बीड, दि. ०५ ऑक्टोबर :
कोणावर चिखलफेक करून नाही तर चिखल तुडवत संघर्ष करण्याचा आपला संस्कार आहे. चिखल तुडवत, कष्ट करत संघर्ष करणे हे आपल्या रक्तातच असून कोणापुढे पदर पसरून मिळणाऱ्या पदांपेक्षा आपला स्वाभिमान कायम जपूया. त्यामुळे 2024 च्या जोरदार तयारीला लागा अशी घोषणा भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी भगवान भक्ती गडावरून केली.

राष्ट्रसंत भगवानबाबा यांचे जन्मगाव असलेल्या सावरगाव घाट येथील भगवान भक्ती गडावर पारंपारिक व ऐतिहासिक दसरा मेळावा मोठया उत्साहात पार पडला. हा मेळावा अतिविशाल गर्दीने व लाखोंच्या संख्येने उपस्थित मुंडे समर्थकांमुळे प्रचंड असा झाला. या मेळाव्याला पंकजा मुंडे यांनी मार्गदर्शन केले.

पंकजा मुंडे म्हणाल्या, विजयादशमी मेळावा ही आपली परंपरा असून संघर्ष करणे हे आपल्या रक्तातच आहे. संघर्ष कोणाला चुकला नाही. संत भगवान बाबाच्या आयुष्यातही त्यांनी संघर्षातूनच भगवानगड संस्थापित केला. मुंडे यांनीही आयुष्यभर संघर्ष केला परंतु कधीही आपला स्वाभिमान कमी होऊ दिला नाही. त्याच वारशाने आपण वाटचाल करत आहोत. कोणावरही चिखल फेक आपण करत नाही कारण हा मेळावा चिखलफेक करणारांचा नाही तर चिखल तुडविणा-यांचा आहे. मी संघर्ष नाकारुच शकत नाही.मी संघर्षाला घाबरतही नाही. ही  हकीकत, हे सत्य आहे. भगवानबाबांनीही संघर्ष व सत्य सोडलं नाही. मुंडे साहेबांनीही शेवटपर्यंत सतत संघर्ष केला. छत्रपती शिवराय, संभाजीराजेंचा आदर्श व भगवानबाबा आणि गोपीनाथ मुंडेचं हे रक्त आहे. त्यामुळे मी थकणार नाही, रुकणार नाही, कधी कोणासमोर झुकणार नाही.

आपली सध्या समर्पणाची भूमिका असून मुंडे साहेबांनी दिलेला वारसा व विचार हाच नरेंद्र मोदींचा, जेपी नड्डांचा आणि  अमित शहा यांचाही आहे. आपण त्याच मुशीतून घडलो आहोत आणि त्याच कुशीतून जन्माला आलो आहोत. त्यामुळे आता कोणत्याही पदाची अपेक्षा ठेवू नका. वेळ येईल त्यावेळी निश्चित सत्याला न्याय मिळणार असतो. सत्य कधी कधी अस्वस्थ होऊ शकते परंतु पराजित होऊ शकत नाही. त्यामुळे संयम सोडू नका समर्पण द्या. अफवा पसरत असतात ,पसरवल्या जात असतात परंतु हकीकत जाणून घेण्याकडे प्राधान्य द्या. आपल्या ध्येयापासून  विचलित होऊ नका असे आवाहन त्यांनी आपल्या समर्थकांना केले. कोणापुढे पदर पसरून आपल्याला कोणतेही पद नको. त्या पदाचा आपल्याला मोह नाही. आपल्याला शोभेल असाच स्वाभिमानी बाणा कायम ठेवूया. 2024 च्या जोरदार तयारीला लागा असे आवाहन त्यांनी आपल्या समर्थकांना यावेळी केले.

काहीही झाले की लगेच पंकजा मुंडे नाराज अशा प्रकारच्या बातम्या चालवल्या जातात परंतु आता हा विषय कायमचा बंद करा. कुठल्या निवडणुका असतील तर आपले नाव चालवणे बातम्यातून बंद करा अशी मिडियाला विनंती आहे. माझ्या लेखी हा विषय आता संपलेला आहे. आपली कोणावरही नाराजी नाही किंवा आपण नाराज नाही असे पंकजा यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *