वैविध्यपूर्ण संस्कृती विदेशी पर्यटकांसाठी आकर्षण
वैविध्यपूर्ण संस्कृती विदेशी पर्यटकांसाठी आकर्षण :
मुंबई, दि. 1 ऑक्टोबर :-
देशाला विविध बोली भाषा, संस्कृती, विलोभनीय निसर्गसौंदर्याचे वरदान लाभले आहे हा अनमोल ठेवा पर्यटकांच्या आकर्षणाचा नेहमीच केंद्रबिदू राहिला आहे. विदेशी पर्यटकांना देशातील या वैविध्यपूर्ण संस्कृतीचे आकर्षण आहे. हे लक्षात घेवून त्यावर आधारित पर्यटन वाढीला चालना देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत, असे प्रतिपादन केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी व्यक्त केले.
छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय येथे देशाच्या अमृतमहोत्सवानिमित्त केंद्रीय पर्यटन मंत्रालयातर्फे पर्यटन पर्व हा उपक्रम २७ सप्टेंबरपासून २ ऑक्टोपर्यंत राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमात केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक बोलत होते.
श्रीपाद नाईक म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून पर्यटन पर्व हा उपक्रम राबविण्यात येत आहे. परदेशी पर्यटक देशात यावेत यासाठी असे उपक्रम अत्यंत महत्वाचे आहेत. देशातील प्रत्येक राज्यातील पर्यटनाची वेगळी ओळख आहे. ही माहिती सर्वांना व्हावी यासाठी पर्यटन पर्व सारखे उपक्रम राबविणे गरजेचे आहे. केंद्र सरकारने नाशिक, मुंबई पोर्ट ट्रस्ट येथेही पर्यटन स्थळ विकासासाठी निधी दिला आहे. जी- २० मधील काही बैठका महाराष्ट्रात होत आहेत. या बैठकांच्या माध्यमातून राज्याला महाराष्ट्रातील पर्यटनाची बलस्थानांची माहिती देता येवू शकते, असे केंद्रीय राज्यमंत्री नाईक म्हणाले,
पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले, राज्यात पर्यटन क्षेत्रात नव्याने काम करू इच्छिणा-यांना शासन सर्वोतोपरी मदत करेल. सकारात्मक निर्णय घेऊन पर्यटनवाढीला चालना देण्याचा प्रयत्न करण्यात येईल. गोवा राज्यानेही पर्यटन क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. महाराष्ट्रातही पर्यटनातून रोजगार वाढीसाठी शासन सर्वोतोपरी सहकार्य करेल.
