फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारांवर चालणारा देशात एकमेव नेता शरद पवार !
फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारांवर चालणारा देशात एकमेव नेता शरद पवार !
मुंबई, दि. 27 सप्टेंबर:
महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर चालणारा देशात एकमेव नेता आहे, ते म्हणजे खा. शरद पवार. त्यांनी महात्मा फुले यांचे स्मारक राष्ट्राला अर्पण करण्यासाठी त्यांचे महत्वपूर्ण योगदान आहे. महात्मा फुले यांनी जी आरक्षणाची संकल्पना मांडली त्यावर पवार यांनी प्रत्यक्ष काम केलं असे उद्गार माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी काढले.
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या कार्यक्रमात ते बोलत होते. भुजबळ पुढे म्हणाले, शरद पवार यांनी मंडल आयोगाची राज्यात अंमलबजावणी करून ओबीसींना शिक्षण, नोकरी आणि राजकरणात आरक्षण देण्याचे काम, देशातील महिलांना राजकारणात ५० टक्के आरक्षण देऊन प्रतिनिधित्व देण्याचे अतिशय महत्वपूर्ण काम त्यांनी केलं. मराठवाडा विद्यापीठाला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याचे संसदेच्या प्रांगणात महात्मा जोतीराव फुले यांचा पुतळा बसविण्याचे काम पावर यांच्या प्रयत्नांतून झाले.
देशात आरक्षणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. आरक्षण हटविण्याचे काम सद्या देशात सुरु आहे. विघातक शक्ती या आरक्षणाला न्यायालयात आव्हान देण्याचे काम करत आहे. हे आरक्षण टिकविण्यासाठी आपला न्यायालयीन लढा सुरू आहे. आपण गेलेलं ओबीसींच आरक्षण टिकविण्याची लढाई आपण जिंकलो आहे. मात्र अद्याप देखील ही लढाई संपलेली नाही. आपली ही लढाई सुरु राहील. यापुढे आपल्याला जेव्हा जेव्हा गरज पडेल त्यावेळी रस्त्यावर उतरून ही आपल्याला लढाई लढावी लागेल. यासाठी तुम्ही आम्ही सर्वांनी सदैव तयार रहायला हवं असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
महात्मा फुले यांनी बहुजन समाजासाठी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. सत्यशोधक समाजाची ही चळवळ ब्राम्हणांच्या विरोधात नव्हती तर ब्राम्ह्ण्यवादाच्या विरोधात होती. या सत्यशोधक चळवळीत आजही देशभरात अनेक लोक काम करत आहे. आज अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने या विचारांना चालना देणाऱ्या समाजसेवकांचा प्रातिनिधिक स्वरूपात सन्मान व्हावा म्हणून या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. ते म्हणाले की, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, फातिमा शेख, छत्रपती शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यसह अनेक समाजसेवकांनी बहुजन समाजाला शिक्षण देण्यासाठी आपलं बलिदान दिल. ज्यांनी आपल्याला शिक्षण दिल या फुले, शाहू, आंबेडकर यांच्या प्रतिमांची तसेच त्यांच्या विचारांची पूजा करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.
देशात अद्यापही अंधश्रद्धा दूर झालेली नाही. ही अंधश्रद्धा दूर करण्यासाठी काही प्रामाणिक प्रयत्न देखील सुरु आहे. मात्र अनेक लोक देशांमध्ये अंधश्रद्धा वाढीला लागली पाहिजे म्हणून जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहे. आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी धर्माधर्मात जातीजातीत भांडणे लावण्यात आहे. अन्याय अत्याचार होत आहे. हे सर्व थांबविण्यासाठी सत्यशोधक समाजाचे महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ.आंबेडकरांचे विचार प्रेरक असून हेच विचार देशाला या यादवीतून वाचवू शकतात.
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या माध्यमातून समता परिषदेचे मुख्य काम महाराष्ट्रात मंडल आयोग लागू करून ओबीसींना आरक्षण मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. पुणे येथे महात्मा फुले राष्ट्रीय स्मारक, नायगाव येथे सावित्रीबाई फुले स्मारक, दिल्ली येथे संसदेच्या परिसरात महात्मा फुले यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यासाठी, केंद्रीय शाळा व नोकऱ्यां मध्ये ओबीसींना आरक्षण मिळवून देण्यासाठी, ओबीसी विद्यार्थ्यासाठी शिष्यवृत्ती, मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार करून डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ करण्यासाठी पाठपुरावा करण्याचे काम करण्यात आले.
पुणे विद्यापीठाला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे नाव देण्यासाठी तसेच सावित्रीबाई फुले यांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्यासाठी प्रयत्न केले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच सावित्रीबाई फुले यांनी पुण्यात मुलींची पहिली शाळा सुरु केली.भिडेवाड्यात सावित्रीबाई फुले आद्य मुलींची शाळा सुरु करण्यासाठी आपले प्रयत्न सुरु असून भिडे वाड्यासाठी रस्त्यावर उतरावे लागेल असे त्यांनी यावेळी सांगितले.
