कोरोनाच्या विषाणुला हरवत नाही तोपर्यंत लढा!

0
20200818_173937

मृत्यूदर रोखण्यासाठी टास्क फोर्सच्या तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्या..

मुंबई, दि. 18 ऑगस्ट..
राज्यात कोरोनाची स्थिती काही ठिकाणी आटोक्यात तर काही जिल्ह्यांत रुग्णांची संख्या वाढतांना दिसत आहे. ही परिस्थिती नियंत्रणात राहील याकडे लक्ष देण्याची गरज आहे. मृत्यूदर रोखण्यासाठी राज्यस्तरीय टास्क फोर्समधील तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेण्याचे घ्या. राज्यात ज्या भागात कोरोनाचे रुग्ण जास्त प्रमाणात आढळून येत आहेत तेथे अतिदक्षता विभागातील (आयसीयू) बेड आणि ऑक्सीजनची व्यवस्था असलेले बेड वाढवा असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.

चाचण्यांचे प्रमाण वाढवावे…
कोरोना उपचारासाठी जम्बो सुविधांची उभारणी राज्यभर सुरु असून पावसाळा, कोरोनाचा प्रादुर्भाव आणि सणवार एकत्र आल्याने अधिक काळजी घेण्याची गरज असल्याचे सांगत पावसाळी आजार डोके वर काढतात त्याकडे लक्ष देण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. चाचण्यांचे प्रमाण वाढवावे, चाचण्यांचे दर नियंत्रित राहतील याकडे लक्ष द्यावे,चाचणी रिपोर्ट लवकर येईल यासाठी प्रयत्न करावेत. कोरोनातून बरे होऊन घरी गेल्यानंतर रुग्णांना पुन्हा त्रास होत असल्याचे दिसून आले आहे त्यामुळे पोस्ट कोविड परिस्थितीकडे, रुग्णांकडे लक्ष देण्याची अधिक गरज असल्याचे ते म्हणाले.

गावागावात जनजागृती मोहिम राबवा …

स्वयंशिस्त, मास्क वापरणे, हात धुणे, स्वच्छता राखणे यासारखे उपायच कोरोनावर सध्याचे औषध असल्याचे सांगतानाच आज ८० टक्के रुग्णांना कोरोनाची लक्षणे नाहीत. पण ते संक्रमण करू शकतात. त्यांच्या माध्यमातून होणारा प्रसार गंभीर बाब असल्याने अशा रुग्णांचे विलगीकरण करणे, त्यांना क्वारंटाईन करणे आवश्यक असून या रुग्णांकडे दुर्लक्ष करू नये, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. कोरोना दक्षता समित्यांच्या माध्यमातून गावागावात जनजागृती मोहिम घेण्याचे आवाहनही त्यांनी केले. कोरोनाच्या विषाणुला जोपर्यंत हरवत नाही तोपर्यंत अहोरात्र अविश्रांत मेहनत सुरु ठेवण्याचे आवाहन त्यांनी यंत्रणेला केले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील अधिका-यांबरोबर कोरोनाबाबत आढावा बैठक घेतली. यावेळी सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महानगर पालिका आयुक्त, जिल्हा पोलिस अधीक्षक, जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याशी व्हीडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा केली. या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार, गृह मंत्री अनिल देशमुख, आरोग्यमंत्री राजेश टोपे, मुख्य सचिव संजय कुमार, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, मुख्यमंत्री कार्यालयाचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, राज्य टास्क फोर्सचे सदस्य सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *