काँग्रेस पक्ष घराणेशाहीचा नाही तर बलिदानाचा इतिहास!
काँग्रेस पक्ष घराणेशाहीचा नाही तर बलिदानाचा इतिहास!
संगमनेर, दि. २४ सप्टेंबर :-
देशात अनेक पक्ष आहेत, त्यांचा अध्यक्ष कोण आहे, कोण होणार याबाबत कधी जास्त चर्चा होत नाही. मात्र काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष कोण होते यावर अधिक चर्चा का होते ? यामध्ये विरोधकांना असलेली काँग्रेसची भिती आहे. कारण काँग्रेस पक्षाला नेहरू-गांधी परिवाराचा इतिहास आहे. गांधी कुटुंबातील सदस्याने देशासाठी बलिदान दिले असून देशाच्या विकासात त्यांचे महत्वपूर्ण असे योगदान आहे. कॉंग्रेसवर नेहमीच घराणेशाहीचा आरोप केला जातो. मात्र कॉंग्रेस पक्ष हा घराणेशाहीचा नाही तर बलिदानाचा इतिहास असल्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.
अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्था संगमनेर येथे स्वातंत्र्यसैनिक सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात व हरित क्रांतीचे प्रणेते डॉ. आण्णासाहेब शिंदे यांच्या जयंती महोत्सवानिमित्त प्रेरणादिन व पुरस्कार सोहळा राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या उपस्थितीत व माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.
भुजबळ म्हणाले की, देशात अनेक महत्वपूर्ण संस्थांची निर्मिती नेहरूंनी केली. त्यातील अनेक संस्था आज विकल्या जात आहेत. निर्माण करण्यात हुशारी लागते मात्र विकण्यास काय लागते ? देशाला अनेकांच्या बलिदानातून स्वातंत्र्य मिळाले. त्यातून प्रत्येकाला आपले विचार मांडण्याचा, बोलण्याचा अधिकार मिळाला आहे. मात्र या अधिकारावर गदा आणण्याचे काम सध्या सुरु असून विरोधात बोलणाऱ्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे मिळालेलं स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी सर्वांची सामुहिक जबाबदारी आहे.
यावेळी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत म्हणाले की, मूळचा काँग्रेसी विचार कधीच संपणार नाही. जोपर्यंत छगन भुजबळ यांच्यासारखी मंडळी आहेत तोपर्यंत काँग्रेसी विचार संपणार नाही.
यावेळी माजी मंत्री बाळासाहेब थोरात, राजस्थान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गोविंदसिंग, उल्हासदादा पवार, डॉ.आ.ह. साळुखे, दिलीपराव देशमुख, डॉ. सुधीर भोंगळे, आमदार सर्वश्री लहू कानडे, हिरामण खोसकर, डॉ. सुधीर तांबे, दुर्गाताई तांबे, सत्यजित तांबे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
