आशिषराव, तुम्ही फारच घाई केली !
आशिषराव, तुम्ही फारच घाई केली !
पुणे, दि. २१ सप्टेंबर
ज्येष्ठ पत्रकार आशिष चांदोरकर यांचे पुण्यातील रहात्या घरी पहाटे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात एक बहिण व कुटुंबीय असा परिवार आहे. आशिष चांदोरकर यांच्या अकाली निधनाने त्यांचे कुटुंब व मित्रपरिवाराला मोठा धक्का बसला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त केला तर आशिष यांचे सहकारी पत्रकारमित्र यांनी आठवणींना उजाळा देत श्रद्धांजली अर्पण केली.
चांदोरकर यांनी पत्रकारितेच्या क्षेत्रात २० वर्षांहून अधिक काम केले. ईटीव्ही मराठी, साम टीव्ही तसेच महाराष्ट्र टाइम्समध्ये त्यांनी काम केले. त्यांच्या खाद्य भ्रमंतीचे असंख्य चाहते होते. सर्वज्ञ मीडीया सर्व्हिसेसचे ते संचालकही होते. क्रीडा, राजकारण, समाजकारण, पर्यटन आणि खाद्यभ्रमंती या विषयांवर त्यांचे लिखाण प्रसिद्ध होते. खाद्यभ्रमंतीसाठी महाराष्ट्र हिंडून तिथल्या खाद्य संस्कृतीची ओळख करून दिली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर लिहिलेले ‘मॅन ऑन मिशन महाराष्ट्र’ हे पुस्तक प्रसिद्ध झाले होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या शोकसंदेशात म्हणतात, राजकीय तसेच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील खाद्यसंस्कृती संदर्भात मौलिक योगदान देणारे ज्येष्ठ पत्रकार आशिष चांदोरकर यांचे निधन झाले.चांदोरकर यांच्या जाण्याने पत्रकारिता क्षेत्राचे कधीही न भरून येणारे नुकसान झाले आहे. त्यांच्या पवित्र आत्म्यास चिरशांती लाभो. भावपूर्ण श्रद्धांजली..तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आशिष चांदोरकर यांच्या निधनावर शोक व्यक्त करताना म्हटले की, ज्येष्ठ पत्रकार आशिष चांदोरकर यांच्या अकस्मात निधनाची बातमी ऐकून धक्काच बसला. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात मी सहभागी आहे. एक चांगला पत्रकार, संशोधक आणि अभ्यासू व्यक्तिमत्त्व आपल्यातून हिरावले आहे. आशिष चांदोरकर यांनी ‘मॅन ऑन मिशन महाराष्ट्र’ या नावाने पुस्तक प्रकाशित केले होते. यासाठी त्यांनी महाराष्ट्रभर प्रवास केला होता आणि त्यात 2014 पासून सरकारच्या विविध योजनांचे लाभ तळागाळापर्यंत कसे पोहोचले, त्या यशोगाथांचा संग्रह त्यांनी प्रत्यक्ष लाभार्थींना भेटून तयार केला होता.
आशिष चांदोरकर यांच्या दिलखुलास स्वभावामुळे त्यांनी असंख्य मित्र जोडले. त्यांच्या निधनाची बातमी कळताच मित्रपरिवारालाही मोठा धक्का बसला.
वरिष्ठ पत्रकार व आशिषचे सहकारी संतोष गोरे यांनी आशिषची आठवणी ताज्या करताना म्हटले, ‘आशिष चांदोरकर यांच्या विषयीच्या वाईट बातमीनं काळजाचा थरकाप उडाला. कारण कायम हसतमुख राहणारं हे व्यक्तीमत्व होतं. ई टीव्हीचं संध्याकाळी 7 वाजताचं महाराष्ट्र माझा हे बुलेटिन आशिष सर ज्या पद्धतीने सजवायचे त्याला तोड नव्हती. आशिषराव तुम्ही फारच घाई केली’.
आशिषचे सहकारी व वरिष्ठ पत्रकार सचिन देशपांडे आशिषच्या आठवणी सांगताना लिहितात, “ई टिव्ही त ज्वाईन झाल्यावर आशिष, श्रीरंग खरे,सचिन फुलपगारे आणि मी आम्ही चौघांनी दिलसुखनगरमध्ये घरोबा केला होता. त्यानंतर चांदोरकर म्हणजे आमचे गुरु. मी पुण्यात गेलो तेव्हा त्याच्या घरी गेलो, तो अकोल्यात जेव्हा जेव्हा आला तेव्हा माझ्या घरी आला, ते पण काही तरी खायला घेऊनच. देवेंद्र फडणवीस यांच्यावर पुस्तक लिहिताना अकोल्याचे काही संदर्भ त्याने माझ्याकडून घेतले. पुस्तक प्रकाशनाच्यावेळी बोलावले देखील. दिलसुखनगर मधील त्याचे शब्द देशपांडे आज तुमच्या हातचा मसाले भात होऊ द्या….हे शब्द आता माझ्या कानात घुमत आहेत. ते शब्द घुमत असताना माझ्या डोळ्यात अश्रुंनी वाट मोकळी केली. आस्थेने चौकशी करणारा मित्र आपण सर्वांनी गमावला. चितळे चा फॅक्टरीचा फुडी आशिष केल्यानंतर त्याला मेसेज केला तो शेवटचा व्हॉट्स अपचा आमच्यातला शेवटचा संवाद होता. आपल्या सर्व ई टि व्ही परिवारातील मित्रांना व आशिषच्या बहिण,जावइ व भाचीला ही दूःखद बातमी सहन करण्याची शक्ती इश्वर देवो हीच प्रार्थना….फारच दूःखद… मित्रा खुप घाई केली.
वरिष्ठ पत्रकार व सातारा लोकमतचे निवासी संपादक दीपक शिंदे यांनीही आशिषच्या आठवणी जाग्या केल्या, आशिषचे अकाली जाणे…जिव्हारी लागणारे आहे…सर्वांचा आधार आणि कायम मार्गदर्शकाच्या भूमिकेत असलेला आशिष ई टी. व्ही आणि नंतर पुन्हा महाराष्ट्र टाइम्स मध्येही सहकारी होता…मित्रा भावपूर्ण श्रद्धांजली.
वरिष्ठ पत्रकार गिरीधर पांडे लिहितात, “खाद्यसंस्कृतीवर आशिषने भरभरून लिहिलं, मनापासून लिहिलं. आशिषने लिहिलेलं वाचलं तरी आपण त्या पदार्थाची चव घेतल्याचा समाधान मिळायचं. आशिषचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे ज्या ज्या ठिकाणच्या खाद्यान्नाची चव त्याने घेतली आणि त्यावर सुरेख लेखन केलं त्या प्रत्येक ठेल्यावर, हॉटेलवरचं त्या त्या वेळचं बिल त्याने स्वतः दिलं आहे, हे अनेक मित्रांना स्मरत असेल. आपण लिहितो आहोत तरीही कुठेही मोफत जेवायचं नाही, हा त्याचा लाखात एक गुण. मित्रा आशिष जेव्हा केव्हा आम्ही बाहेर कुठेही जेवायला जाऊ त्या प्रत्येक वेळी घास घेताना तुझी आठवण निश्चित येईल”.
