यंदा असे करावे लागणार गणेश विसर्जन…
करोनामुळे गणेशोत्सवावर अनेक निर्बंध.
मुंबई, दि. 18 ऑगस्ट
कोरोनाच्या संकटात सण उत्सवाचे रंग फिके पडले असून लाडक्या गणेशोत्सवावरही याचा परिणाम झाला आहे. यावर्षी गणेशोत्सव अत्यंत साध्या पद्धतीनेच साजरा करावा लागणार आहे. ना मिरवणूक, ना ढोल ताशाचा आवाज, ना गुलालाची उधळण. सगळे बंद असणार आहे. गणेशमूर्ती सुद्धा घरासाठी 2 फुट व सार्वजनिक मंडळासाठी 4 फुटच ठेवण्याचा आदेश सरकारने यापूर्वीच दिला आहे. आता विसर्जनसुद्धा शांततेत करावे लागणार आहे. विसर्जनासाठी घराबाहेर पडता येणार नाही.
मुंबई महापालिकेने गणेश विसर्जन कसे करायचे याची नियमावलीच जारी केली आहे..
अशी आहे BMC ची गणेश विसर्जन नियमावली….
मुंबई शहरात यावर्षी गेल्या वर्षीच्या पाच पटीने अधिक (१६७) कृत्रिम विसर्जन स्थळे तयार करण्यात आली आहेत. सोसट्यांच्या आवारात कंटेन्मेंट झोनमध्ये तात्पुरती विसर्जनस्थळे तयार करण्याची परवानगी देण्यात आली आहे. विभाग स्तरावर फिरती विसर्जन स्थळे देखील तयार करण्यात आली आहेत. गणेश विसर्जनाला गर्दी करता येणार नाही. घरापासून 2 किमी पेक्षा दूर जाऊन विसर्जन करता येणार नाही.
घरगुती गणपती विसर्जनासाठी एकावेळी पाचपेक्षा जास्त भाविकांनी येऊ नये, विसर्जनस्थळी आरती करू नये. फिरते कृत्रिम विसर्जन तलाव असणार आहे. ट्रकवर आकर्षक असे कृत्रिम तलाव तयार करण्यात येणार आहेत. ठराविक ठिकाणी हे ट्रक उभे केले जातील.हे ट्रक मूर्तींनी पूर्ण भरले की मग ते विसर्जनस्थळी नेऊन गणेशमूर्ती विसर्जित केल्या जातील.
कोरोनानं विघ्नहर्त्यालाही संकटात टाकले असून गणपती बाप्पा मोरयाचा आवाजही यावेळी घुमणार नाही.
