शिव संवाद यात्रेला खेड-दापोलीत जोरदार प्रतिसाद
शिव संवाद यात्रेला खेड-दापोलीत जोरदार प्रतिसाद…
दापोली, दि. 17 सप्टेंबर :
आमदार आहात लोकोपयोगी कामं करा, भाईगिरी करू नका, असा सज्जड दम शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना दापोली येथे दिला. आदित्य ठाकरे यांची शिव संवाद यात्रा दापोली येथे धडकली. यावेळी त्यांनी बंडखोर आमदार योगेश कदम तसंच माजी आमदार रामदास भाई कदम यांचा उल्लेख न करता सज्जड दम भरला. यावेळी आदित्य ठाकरे यांनी मित्रांनीच पाठीत खंजीर खुपसल्याची खंत व्यक्त केली.

आदित्य ठाकरे यांच्या शिव संवाद यात्रेचा पाचवा टप्पा रत्नागिरी, चिपळूण दापोली येथे पार पडला. यावेळी खेड-दापोलीत आदित्य ठाकरे यांना जोरदार प्रतिसाद मिळाला. दापोली येथे आदित्य ठाकरे यांनी शिवसैनिकांशी संवाद साधताना बंडखोरांवर जोरदार हल्ला चढवला. मित्रांनीच माझ्या पाठीत खंजीर खुपसला. काय कमी केलं ज्यांनी पाठीत खंजीर खूपसला? कठीण काळात उद्धव साहेबांना सोडलं. हे गद्दारांचे कारनामे बघा कोणी पिस्तूल काढतो, कोणी धमकावतो आता मला वाटतंय बर झाले ते गेले कारण नवीन ४० जणांना संधी देता येईल.
आदित्य ठाकरे यांनी वेदांता प्रकल्पावरून मुख्यमंत्र्यांवर देखील निशाणा साधला.मुख्यमंत्र्यांना माहितीही नव्हतं की वेदांता प्रकल्प काय आहे? असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला. हे सरकार घटनाबाह्य आहे हे सरकार कोसळणार म्हणजे कोसळणारच…मी तात्पुरते मुख्यमंत्री म्हणतोय कारण हे सरकार कोसळणार आहे, असा विश्वास आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला. पुढे म्हणाले, प्रकल्प कुठे गेला याचं काही नाही पण उद्योग मंत्र्यांना माहितही नाही की हा प्रकल्प कसा गेला. समोर असणाऱ्या तरुणांना नोकरी मिळाली असती. मुख्यमंत्री अनेक वेळा दिल्लीला गेलेले आहात दिल्ली समोर जाऊन झुकून आलेला आहात, महाराष्ट्रासाठी एकदा दिल्लीला जा, असा सल्ला आदित्य ठाकरे यांनी दिला.
