स्काऊट, गाईड व NCC चे गिरगाव व जुहू चौपाटी स्वच्छता अभियान
स्काऊट, गाईड व NCC चे गिरगाव व जुहू चौपाटी स्वच्छता अभियान..
मुंबई, दि. १० सप्टेंबर;
गिरगाव चौपाटी येथे महाराष्ट्र राज्य भारत स्काऊटस् आणि गाईडस् राज्यसंस्थेच्या वतीने स्वच्छता अभियान राबविण्यात आले. राज्य कार्यालयातील कर्मचारी अधिकारी असे ४०० सभासद. एन.सी.सी. मधील १५०० मुले व मुली आणि अधिकारी असे एकूण १९०० सभासद या मोहिमेमध्ये सहभागी झाले. जुहू चौपाटी येथे ३०० विद्यार्थी स्वच्छता मोहीमेत सहभागी झाले होते.

एन.सी.सी व स्काऊट गाईड विद्यार्थी संयुक्तरीत्या गिरगाव चौपाटी येथे उपस्थित राहून गणेश विसर्जन नंतर जमा होणाऱ्या निर्माल्याची व इतर कचऱ्याची स्वच्छता केली. या स्वच्छता अभियानात ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविला. महाराष्ट्र राज्य भारत स्काऊटस् आणि गाईडस् राज्य संस्थेचे एन बी. मोटे, राज्य चिटणीस (अ.का). तसेच अनेक मान्यवर सदर स्वच्छता अभियानामध्ये उपस्थित होते.
स्काऊट गाईड चळवळ चारित्र्य हस्तव्यवसाय आरोग्य व सेवा या चार मूलभूत अधारस्तंभावर आधारलेली आहे. आज या गुणाची देशाला सुजाण नागरिक घडविण्यासाठी नितांत गरज आहे. मुलांना मूल्याधारित नैतिक शिक्षण देण्यासाठी देशात शालेय स्तरावर स्काऊट गाईड सारख्या संस्कार घडविणाऱ्या शैक्षणिक उपक्रमाची ओळख आहे. या चळवळीमधून चारित्र्य, स्वावलंबन, आरोग्य व सेवा या मूल्याची जोपासना करुण मुला- मुलींच्या अंगी असलेल्या नेतृत्व गुणाचा विकास, चारित्र्य संवर्धन, आरोग्य, खिलाडूवृत्ती व सेवाभाव निर्माण करुण देशाचे उत्तम नागरिक घडावे हा या शिक्षणाचा उद्देश आहे. शीलसंवर्धन, आरोग्य, व्यवसाय व सेवा ही स्काऊट गाईड चळवळीची चतु:सूत्री आहे. तरुण मुलांचा, ओढा इंटरनेट, मोबाइल, टीव्ही यांच्याकडे अधिक आहे अशा परिस्थितीत पर्यावरणमैत्री, समाजसेवा, यांच्याकडे विद्यार्थ्यांना वळविणे याकरिता विविध सेवा प्रकल्पाचे आयोजन स्काऊटस् आणि गाईडस् राज्यसंस्थेच्या वतीने करण्यात येते.
गिरीश महाजन म्हणाले, ‘स्वच्छ मुंबई सुंदर मुंबई’ ही संकल्पना पुढे ठेवून स्वच्छता ही सर्वांची जबाबदारी आहे. ज्या भावनेने आपण गणेशाचे पूजन केले, त्याच भावनेने आपण स्वच्छताही केली पाहिजे. स्काउट गाइड यांनी गिरगाव चौपाट येथे स्वच्छता अभियान राबविले. त्याबद्दल महाजन यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या.
