सण-उत्सवाच्या वेळेस राजकारण करणे बालिशपणा…
सण-उत्सवाच्या वेळेस राजकारण करणे बालिशपणा…
मुंबई, दि. २ सप्टेंबर:
शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी शुक्रवारी दक्षिण मुंबईतील कुलब्याचा युवराज, फोर्टचा इच्छापूर्ती, अखिल चंदनवाडी, गिरगावचा महाराजाचं दर्शन घेतलं. ‘कुलब्याचा युवराज’ बाप्पाचं दर्शन घेतल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी सत्ताधाऱ्यांकडून सुरू असलेल्या राजकारणावर सडकून टीका केली. सण उत्सवाच्या वेळेस राजकारण करणे हे बालिशपणा आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
जो कोणी राजकारण करत असेल हे सर्व लोकांना दिसत आहे. लोकांना राजकारणाचा कंटाळा आला आहे. सध्या सगळीकडेच राजकारण सुरू आहे. सगळीकडे सुरू असलेले राजकारण हे कोणालाही पसंत येत नाही. कोणाच्या आशीर्वादामुळे नाहीतर गणपती बाप्पाच्या आशीर्वादामुळे सर्व सुरू आहे, असे म्हणत आदित्य ठाकरे यांनी सुरू असलेल्या जाहिरातबाजीवर टीका केली.
आदित्य ठाकरे यांनी मनसे पदाधिकाऱ्याने महिलेला केल्या मारहाणीवर देखील भाष्य केलं. हा घाणेरडा प्रकार होता. मी पाहिलं अगदी राग येण्यासारखा तो प्रकार आहे. कोणत्याही पक्षाचा पदाधिकारी असो किंवा कार्यकर्ता असो असं करणं योग्य नाही. कडक कारवाई झाली पाहिजे आणि ती कारवाई लोकांना दिसली पाहिजे. महिलेवर हात उचलला हे योग्य नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली.
