आमदार विकत घेण्यासाठी भाजपाने पैसा कुठून आणला ?
आमदार विकत घेण्यासाठी भाजपाने पैसा कुठून आणला ?
मुंबई, दि. 1 सप्टेंबर :
भाजपा सरकार जनतेच्या रक्ताच्या आणि घामाने गोळा केलेला कर आपल्या अब्जाधीश मित्रांचे कर्ज माफ करण्यासाठी वापरत असून आमदार विकत घेण्याचे काम करत आहे. सरकार पाडण्यासाठी सीबीआय आणि ईडीचा गैरवापर होत असल्याचे आरोप आम आदमी पार्टी महाराष्ट्राच्या नेत्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
पत्रकार परिषदेत बोलताना राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्या व मुंबई अध्यक्षा प्रीती शर्मा मेनन म्हणाल्या की, सीबीआय आणि ईडीचा वापर करून देशातील अनेक राज्यांमध्ये निवडून आलेली सरकारे पाडण्याचे काम भाजप सरकारने केले आहे. नुकतेच महाराष्ट्र सरकारही अशाच प्रकारे खाली आणले गेले. यापूर्वी बिहार, आसाम, मेघालय, गोवा, मणिपूरमध्ये आमदार खरेदी करून सरकार पाडण्यात आली. भाजप सामान्य जनतेच्या कराचा पैसा आमदारांना विकत घेण्यासाठी वापरत आहे. आपल्या अब्जाधीश मित्रांची कर्जे माफ करण्यासाठी सर्वसामान्य जनतेचे कष्टाचे पैसे वापरत आहेत. भाजपने आतापर्यंत देशभरात २२७ आमदार खरेदी केले असून २० कोटींचा व्यवहार झाला असला तरी या कामात ५५०० कोटी रुपये खर्च झाले आहेत, असा आरोप प्रीती शर्मा मेनन यांनी केला.
महाराष्ट्राचे सहसंयोजक किशोर मानाध्याय म्हणाले, भारतीय जनता पक्षाचे सरकार सर्वसामान्यांचे दु:ख दूर करण्याचे कोणतेही काम करत नाही. दिल्लीत आम आदमी पार्टीच्या ४० आमदारांना प्रत्येकी २० कोटी देऊन विकत घेण्यातही भाजपाचे षडयंत्र फसले. आम्हाला विचारायचे आहे, की हे ८०० कोटी कुठून आले आणि ते कोणाचे आहेत, याचे उत्तर भाजपाने आम जनतेला द्यावे.
माजी खासदार आणि आम आदमी पक्षाचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ राठोड म्हणाले की, “डिझेल २०१४ मध्ये ५४ रुपये होते ते आज ९४ रुपये झाले आहे. त्याचप्रमाणे पेट्रोलचे दर ६० रुपयांवरून १०६ रुपयांपर्यंत वाढले आहेत. सी. एन. जी (CNG) ३५ रुपयांवरून ८० रुपयांपर्यंत वाढला आहे. एलपीजी सिलेंडर जे सुमारे ४०० रुपयाला मिळत होता, तो १००० रुपयांच्या वर गेला असून मन्या माणसाचं महागाईमुळे जनजीवन विस्कळीत होत आहे, असा आरोप हरिभाऊ राठोड यांनी केला.
माजी पोलिस अधिकारी आणि आम आदमी पक्षाचे ज्येष्ठ नेते धनराज वंजारी म्हणाले की, “खाद्यपदार्थांवर जीएसटी लागू केल्यामुळे महागाई आणखी वाढली आहे. स्वयंपाकाचे तेल पूर्वी ७० रुपयांना मिळत होते, ते आज १७० वर गेले आहे. तसेच सर्वच खाद्यपदार्थांवर कर लादून सर्वसामान्यांना महागाईचा फटका बसत आहे, असे मत धनराज वंजारी यांनी व्यक्त केले.
