देश अखंड राहण्यास गांधी, नेहरु, पटेल, आंबेडकरांचे योगदान..
देश अखंड राहण्यास गांधी, नेहरु, पटेल, आंबेडकरांचे योगदान
…..
मुंबई, दि. 26 ऑगस्ट:-
जगात सर्वात जास्त विविधता, जाती, धर्म, पंथ असलेला भारत हा आजपर्यंत अखंड राहीला. ज्यामुळे हा देश अखंड रहिला तो केवळ ‘हा भारत देश सर्वांचा आहे हे विचार’ आणि याचे सर्व श्रेय महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरु, सरदार पटेल व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आपल्याला द्यावेच लागेल असे मत माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा निमित्त मांडण्यात आलेल्या अभिनंदन ठरावावर त्यांनी सभागृहात आपले मत व्यक्त केले. ते म्हणाले की, भारताच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना हा एक खंडप्राय देश रहावा यासाठी संघर्ष करणाऱ्या सर्वांना अभिवादन करावे लागेल. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना “हर घर तिरंगा ” हा उपक्रम राबविण्यात आला तो राबवित असताना सरकारने सांगितले की भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर, जनतेच्या मनात या स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत रहाव्यात, स्वातंत्र्य संग्रामातील अज्ञात नायक, क्रांतीकारक, स्वातंत्र्य संग्रामात घडलेल्या विवीध घटना यांचे स्मरण व्हावे, स्वातंत्र्यासाठी चेतवलेले स्फुल्लिंग कायम तेवत रहावे व देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरूपी जनमानसात रहावी, या उद्देशाने या दैदिप्यमान इतिहासाचे अभिमानपूर्वक संस्मरण करण्यासाठी आजादी का अमृत महोत्सव अर्थात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत हर घर झंडा हा उपक्रम राबववण्यात येत आहे. मग ते स्वातंत्र्य नेमकं काय आणि १९४७ पर्यंतच नाहीतर स्वातंत्र्यानंतरचा कालखंड देखील आपण समजुन घेतला पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले.
देशाच्या या स्वातंत्र्यात महात्मा गांधी,नेताजी सुभाषचंद्र बोस, रविंद्रनाथ टागोर,पंडित जवाहरलाल नेहरू,खान अब्दुल गफार खान,विनोबा भावे, जे. बी. कृपलानी, लोकमान्य टिळक, चक्रवर्ती राजगोपालाचारी, सरदार वल्लभभाई पटेल, पं. मदन मोहन मालवीय,डॉ. राजेंद्र प्रसाद, देशबंधु चित्तरंजन दास नारायण, साने गुरुजी, राजाराममोहन रॉय, क्रांतिसिंह नाना पाटील, लाला लजपतराय,झाशीची राणी लक्ष्मीबाई,दादाभाई नौरोजी, सी. एन. अण्णादुराई, शेख मुजीबूर रेहमान, स्वातंत्र्यवीर सावरकर, डॉ बाबासाहेब आबेडकर, तात्या टोपे, लोकनायक जयप्रकाश यांच्यासह अनेक ज्ञात व अज्ञात स्वातंत्र्य वीरांनी आपले आयुष्य हे या देशासाठी अर्पण केले असल्याचे त्यांनी सांगितले.
हिंदुस्थान हे एक राष्ट्रच नाही असंख्य जातीजमाती, विविध धर्म आणि नाना भाषा बोलणाऱ्यांचा तो एक खंडप्राय भूभाग आहे. भारतातून पाय काढताच ब्रिटिशांनी संस्थानिकांना स्वतंत्र राहण्याची मुभा देऊन या देशाचे तुकडे कसे होतील, याचीच तरतूद केली होती. मात्र सरदार पटेल यांच्यासारखा करारी आणि पोलादी गृहमंत्री लाभल्याने ब्रिटिशांचे सारे मनसुबे उधळले गेले.सरदार वल्लभभाई पटेल म्हणजे एक कणखर व्यक्तिमत्त्व! भारताचे पोलादी पुरुष अशी प्रतिमा असणा-या पटेल यांनी स्वातंत्र्यानंतर देशातील ५६५ संस्थांचे कोणताही रक्तपाताशिवाय विलीनीकरण करून सामर्थ्यशाली आणि एकसंध भारत घडवला.
स्वातंत्र्यानंतर संस्थाने खालसा होऊन एकसंध भारत निर्माण होण्यास कमीत कमी १५ वर्ष लागतील,’ असा अंदाज क्रिप्स नावाच्या ब्रिटिश अधिका-यांनी बांधला होता. मात्र सरदारांनी केवळ १५ महिन्यांच्या कालावधीत ही किमया केल्याने ब्रिटिशांना तो मोठा धक्का होता.फाळणीनंतर उफाळलेल्या हिंसाचारानंतर शांतीस्थापनेकरीताही त्यांनी कार्य केले असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.
मुळात जेंव्हा देश स्वातंत्र झाला त्यावेळेस नेहरुंना पंतप्रधान पदासाठी ज्यांनी पाठींबा दिला त्यात वल्लभभाई पटेल होते आणि ज्यावेळेस देशातील सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या त्यावेळीस मुळात दुर्दैवाने वल्लभभाई यांचे निधन झाले होते. हा इतिहास जनिवपूर्वक दडवला जातो. १४ नोव्हेंबर १९४९ रोजी नेहरूंवरील गौरवपर ग्रंथाच्या प्रकाशनावेळी पटेल सांगतात, लोक आम्हा दोघांना वेगळं करु शकत नाहीत, एवढे आम्ही जवळ आलेलो आहोत. आम्हा दोघांमधलं बंधुतुल्य प्रेम सर्वांना ठाऊक आहे. पंतप्रधान नेहरू हे राष्ट्रासाठी ‘आयडॉल’ आहेत, जनसामान्यांचे ‘हिरो’ आहेत. त्यांच्या प्रशंसेकरता माझ्याकडं पुरेसे शब्द नाहीत.सरदार पटेल गेल्यानंतर १५ डिसेंबर १९५० ला नेहरूंनी जे स्टेटमेंट दिलं त्यात म्हटलं आहे: ” शेजारी बसून आम्ही दोघांनी किती काळ एकत्र व्यतीत केला, हे तुम्हाला ठाऊक आहेच. मी या रिकाम्या बाकाकडे पाहीन तेव्हा माझं एकटपण अधिक दाटून येईल. मी एकटा पडलो आहे, उदासीची पोकळी जाणवते आहे. आपण आपल्या स्वातंत्र्य चळवळीतला मोठा ‘कॅप्टन’ गमावला असल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या.
आपले पहिले पंतप्रधान पंडित नेहरू ९ वेळा तुरुंगात जाऊन अनेक वर्ष त्यांनी तुरुंगात घालवले.त्यांच्या कारावासात या अनोख्या विद्वानाने जगाचा आणि भारताचा इतिहास लिहिला आणि अनेक पुस्तके आपल्याला भेट म्हणून दिली. प्रगतीविज्ञान चरितार्थ करणारे अनेक विकासकामे त्यांच्या नेतृत्वाखालील सरकारने केले आहेत.गेली ७५ वर्षे पंडितजीं शिवाय स्वातंत्र्याचा इतिहास आणि स्वतंत्र भारत घडवण्याचा इतिहास अपूर्ण आहे असेही ते म्हणाले.
भारताचा स्वातंत्र्याचा लढा काँग्रेसने उभारला. भारताच्या स्वांतत्र्यानंतरचा ९० टक्के विकास हा काँग्रेसने केला आहे. १९४७ ला जेंव्हा हा देश स्वतंत्र झाला तेंव्हा काय परिस्थीती होती. देशाचे दोन भाग झाले होते. जातिय हिंसाचार सुरु होता ही सगळी इंग्रजांची देण. त्यामुऴे अश्या परिस्थीतीमध्ये नेहरुंना हा देश पुढे घेऊन जायचा होता आणि हे आवाहन नेहरुंनी पेललं. पंडित जवाहरलाल नेहरू यांचे सर्वात मोठे योगदान जर कोणते असेल, तर या देशाला त्यांनी लोकशाहीचा भक्कम आधारस्तंभ लाभू दिला. स्वतंत्र भारताच्या परराष्ट्र धोरणाला अतिशय योग्य असा आकार दिला. भारताने तटस्थतेचे धोरण स्वीकारले, त्याचे प्रणेते हे केवळ नेहरूच आहेत. त्या वेळच्या परिस्थितीत अमेरिकेच्या बाजूने जाणे योग्य ठरले नसते आणि तेव्हा कम्युनिस्ट असलेल्या सोव्हिएत युनियनच्या गटात जाऊन बसणे आत्मघाती ठरले असते. नेहरूंनी स्वत:चा स्वतंत्र अलिप्त गट तयार केला, ज्याला तेव्हा इजिप्तचे गमाल अब्दुल नास्सेर, इंडोनेशियाचे नेते सुकार्नो, घानाचे नेते एनक्रुमा, तेव्हाच्या युगोस्लाव्हियाचे मार्शल टिटो यांनी तसेच इतरांनी पाठिंबा दिला. परराष्ट्र राजकारणातले नेहरूंचे हे स्थान भल्याभल्यांनी मान्य केले असल्याचे त्यांनी सांगितले.
भारतात स्वातंत्र्योत्तर काळात दारिद्रय, निरक्षरता, अन्नधान्याची टंचाई, प्रचंड सामाजिक व आर्थिक विषमता असतांनादेखील भारताला नवसमाज निर्मितीचे स्वप्न देणारे आणि प्रत्यक्षात नवसमाज निर्मितीच्यादृष्टिने कृतीशील प्रयत्न करणारे नेतृत्व म्हणून भारताचे प्रथम पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्याकडे पाहिले जाते.
पंडीत नेहरू यांच्या आधुनिक विचारांचा, त्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाचा, नेतृत्व व कर्तृत्वाचा भारताच्या जडणघडणीत निश्चितच सिंहाचा वाटा आहे. पंतप्रधानपदी असतांना आधुनिक भारताच्या राजकारणारवर सर्वाधिक छाप पाडुन भारताला योग्य दिशा देण्याचे कार्य पंडीतजींनी केले. नवस्वतंत्र भारतासमोर फाळणी,कर्जाचा डोंगर,सततचा दुष्काळ व अन्नधान्याची टंचाई,संस्थानांच्या विलीनीकरणाचा प्रश्न, दारिद्रय, निरक्षरता, सामाजिक व आर्थिक विषमता इ. विविध समस्यांचा डोंगर उभा असतांना स्वतंत्र भारताचे प्रथम पंतप्रधान पंडीत नेहरू यांनी खंबीरपणे भारताचे नेतृत्व केले असल्याचे त्यांनी सांगितले.
१९५० मध्ये भारतात नियोजनातुन विकास करण्यासाठी नियोजन आयोगाची स्थापना करण्यात आली. नेहरू हे नियोजन आयोगाचे प्रथम अध्यक्ष होते . पंचवार्षिक योजनांमुळे भारताच्या परकिय चलनात वाढ झाली, पर्यायाने भारताची अर्थव्यवस्था सावरण्यास चांगलीच मदत झाली. ग्रामीण जीवनाचा सर्वांगीण विकास घडवून आणणे , तेथील जनतेच्या दृष्टिकोणात बदल निर्माण करणे हे पंडीत नेहरूंनी सुरू केलेल्या ‘ समुह विकास योजनेचे उद्दीष्ट होते. मानवतावादी दृष्टिकोणातून पंडीत नेहरूंनी निःशस्त्रीकरणाचा स्विकार केला. पंडीत नेहरूंनी संसदेत अणूऊर्जा विधेयक सादर करून भारताच्या आण्विक कार्यक्रमाला अंतिम स्वरूप दिले असल्याचे त्यांनी सांगितले.
