खाजगी लुटारु हाॅस्पिटलला भाजपने शिकवला धडा!

0
IMG-20200816-WA0037

कुर्ला येथील कोहिनूर रुग्णालयात सामान्य रुग्णाला.
लाखाचे बिल आकारल्याच्या प्रकरणाचा पर्दाफाश.

मुंबई दि. १६-

कोरोना रुग्णांची खाजगी हाॅस्पिटलमध्ये प्रचंड लूट सुरू असून बिल पाहूनच डोळे पांढरे होतात. लाखो रुपयांची बिलं देऊन  सर्रास लूट होत आहे. कुर्ला येथील एका सामान्य रुग्णाला  17  लाख रुपयांचे बिल कोहिनूर हाॅस्पिटलने आकारले. विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी या रुग्णालयाला भेट दिली व या गंभीर प्रकाराचा पर्दाफाश केला. त्यामुळे हॉस्पिटलचे प्रशासन ताळ्यावर आले. त्या सामान्य रुग्णाला अवाजवी बिल आकारल्याचे सिद्ध झाले. त्यानंतर बिल कमी करण्यात आले. अशा पद्धतीची लूट खासगी रुग्णालयात सुरू असून ही लूट थांबविण्याचे आवाहन प्रविण दरेकर यांनी केले.

प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना दरेकर म्हणाले की, “खाजगी हॉस्पिटलची कार्यपद्धती उघडकीस आली असून किती भयानक पद्धतीने बिल आकारले जाते, याचे मूर्तिमंत उदाहरण एका सामान्य रुग्णाच्या बिलाच्या माध्यमातून उघडकीस आले आहे. रामचंद्र दरेकर असे या रुग्णाचे नाव आहे. एका महिन्याचे बिल १७ लाख १० हजार आकारण्यात आले. यांसदर्भात आपण आणि मंगल प्रभात लोढा येथे येणार आहे कळल्यानंतर हे बिल १३ लाखांपर्यंत कमी करण्यात आले. या १३ लाखाच्या बिलाची विभागवारी मागितली असता, २ लाख रुपये हे फक्त पीपीई किटचे दाखविले आहेत. साधारणतः एका पीपीई किटला २७०० रुपये आकारले आहेत, त्याची बाजारात ३०० रुपये किंमत आहे. रुपये ४०० ते ५०० इंजेक्शनसाठी आकारले आहेत. पण ८२ वर्षाचा रुग्ण आहे. त्यांच्यावर एवढ्या मोठ्या प्रमाणात इंजेक्शन्स कार्यान्वित होऊ शकतात का ? हाही एक प्रश्न उपस्थित होतो. दीड ते २ लाखाचे बिल हे १७-१८ लाख रुपयांवर जाते यापेक्षा गोरगरिबांची लूट काय असू शकते.
या लुटीवर महापालिकेचे कुठल्याही प्रकारचे नियंत्रण नाही. फक्त बेड द्यायचे. पण वैदयकीय साहित्य, औषधे कितीला खरेदी करायचे यावर ना पोलिसांचे नियंत्रण, ना सरकारचे नियंत्रण. त्यामुळे आम्ही ५० बेड आरक्षित केले म्हणजे आम्ही गरिबांसाठी काहीतरी केले, या महापालिकेच्या दाव्याला काही अर्थ नाही. कारण बेड ज्या कमी किंमतीला ठरूवून दिले आहेत त्याची अधिकची वसुली विविध पद्धतीच्या औषधांच्या किंमतीच्या माध्यमातून केली जात आहे. असे हे विदारक चित्र उघड झाले आहे. म्हणजे २ लाखाची पीपीई किट लागणे म्हणजे एका रुग्णाला दिवसातून ३ वेळा पीपीई किट घालून तपासणे असे अर्थ होतो, पण एक पीपीई किट घालून एक डॉक्टर एकावेळी २५ ते ५० रुग्णांना तपासू शकतो. अशाप्रकारे पळवाट काढून सर्वसामान्य रुग्णांची लूट खाजगी रुग्णालयांकडून केली जाते. हे भारतीय जनता पार्टी सहन करणार नाही. याआधी आपण बोरिवलीच्या अँपेक्स हॉस्पिटल मध्येही असे प्रकरण उघडकीस आणसे, कांदिवलीच्या पार्थ हॉस्पिटलचे प्रकरण काढले, ठाण्यातही असे लूटमारचे प्रकार घडत आहेत, त्यामुळे आता भाजपच्यावतीने मुंबईतील सर्व खासगी हॉस्पिटलचा लेखाजोखा घेण्यात येईल,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
विरोधी पक्ष नेते दरेकर यांनी कोहिनूर रुग्णालयाला भेट दिली. रुग्णालायच्या वतीने रुग्णालयाचे उपाध्यक्ष अतुल मोडक उपस्थित होते. दरेकर यांनी यावेळी रुग्णाला पाठविण्यात आलेल्या लाखो रुपयांच्या बिलाची माहिती मोडक तसेच प्रशासकीय अधिका-यांना विचारली. त्यानंतर वैदयकीय उपचारासह अन्य वैदयकीय साहित्याचे अवाजवी बिल रुग्णालयाकडून आकारल्याचे यावेळी दरेकर यांनी सिध्द करुन दाखविले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *