BMC च्या महाभारतासाठी फडणवीस ‘कृष्ण’ तर शिंदे ‘कर्ण’!

0
शेलार

BMC च्या महाभारतासाठी फडणवीस ‘कृष्ण’ तर शिंदे ‘कर्ण’!

मुंबई, दि. २० ऑगस्ट;

मुंबई महापालिकेवर २५ वर्षे शिवसेनेची सत्ता आहे पण त्यांनी मुंबईकरांना काय दिले. मेट्रो देवेंद्र फडणवीस यांनी दिली, ५२ पुल नितीन गडकरींनी दिले. मुंबईला सुरक्षित करण्याचे काम गोपीनाथ मुंडेंनी केले. बुलेट ट्रेनची कनेक्टिव्हिटी मोदी सरकारने दिली. कोस्टल रोडची परवानगी आणि मुहूर्तमेढ फडणवीस सरकारने रोवली. मिठी नदीला स्वच्छ करण्यासाठी अर्धा निधी केंद्र सरकारने दिला. ब्रिमस्टोवड प्रकल्पासाठी अर्धे पैसे केंद्र सरकारने दिले. रेल्वेसाठी निधी मोदी सरकारने दिला. मुंबईकरांना शिवसेनेने काय दिलं? तर भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचार दिला, असा घणाघाती हल्ला मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी केला.

भाजपा मेळाव्यात बोलताना ते पुढे म्हणाले की,ही लढाई अधर्माच्या विरोधातील आहे. ही लढाई घराणेशाहीच्या विरोधातील आहे. एक परिवार २५ वर्षे चालला. मुंबईकर टाहो फोडत आहे. आम्हाला लोकशाहीचे सरकार हवे आहे. महानगरपालिकेत मुंबईकरांना मुंबईकरांची सत्ता हवी आहे. मुंबईकरांची सत्ता देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात मिळेल. भारत नवभारत होत आहे. थोडसं महाभारत देखील बदलत आहे. कौरव आणि पांडवामधील युद्ध अटळ होते तेव्हा भगवान श्री कृष्ण कर्णाला सांगायला गेले की, तू या युद्धाचा भाग बनू नको, कारण धर्म पांडवांच्या बाजूला आहे. भगवान श्रीकृष्णाचे कर्णाने ऐकले नाही. आजचे महाभारत वेगळे आहे. देवेंद्ररुपी कृष्णाने एकनाथरुपी कर्णाला बाजूला काढले त्यामुळे भ्रष्टाचाराच्या या लढाईत कृष्णही आणि कर्णही आमच्या बाजूने आहे. महापालिकेतील लढाईत भारतीय जनता पक्षाचा महापौर आता कोणीही थांबवू शकत नाही.

मुंबईत मुंबईकरांचे राज्य येण्याला कोणीही थांबवू शकत नाही. निवडणुकीत पूर्वीच्या काळात कार्यकर्त्यांनी पायाला भिंगरी बांधून प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचे आवाहन आमदार शेलार यांनी केले. शिवसेनेने केलेल्या भ्रष्टाचाराचा पाढा वाचायचा आहे. कुठल्याही परिस्थितीत मुंबई आपल्याला जिंकायची आहे, असेही शेलार म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *