बाळासाहेब ठाकरेंचे मुंबईचे स्वप्न पुर्ण करू !
बाळासाहेब ठाकरेंचे मुंबईचे स्वप्न पुर्ण करू !
मुंबई, दि. २० ऑगस्ट:
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी जे स्वप्न मुंबईकरांच्या मनातील मुंबईकरीता बघितले होते ते स्वप्न पूर्ण करायची जबाबदारी आपली आहे. बाळासाहेबांचे नाव सांगून जे निवडून आले त्यांनी त्यांचे स्वप्न धुळीस मिळवले. ते स्वप्न पूर्ण करू शकले नाहीत, ते इतके आत्ममग्न होते, इतके आत्मकेंद्रीत होते की, स्वतःच्या पलीकडे ते पाहू शकले नाहीत. आता मुंबईकरांसाठी काम करणाऱ्यांना आपण निवडून आणायचे आणि जे स्वप्न बाळासाहेब ठाकरेंनी पाहिले ते पुर्ण करण्याचे काम करण्यासाठी कामाला लागा, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात मुंबई भाजपाचा कार्यकर्ता मेळाव्याते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.
मागच्यावेळीच भाजपचा महापौर झाला असता पण शिवसेनेसाठी आम्ही दोन पावले मागे आलो. जे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावावर निवडून आले त्यांनी मुंबईला वाऱ्यावर सोडले. आपल्याला बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करायचे आहे. मागचा आपला स्ट्राईक रेट मोठा होता. आपण ३५ वरून ८२ जागांवर आलो. आता आपला स्ट्राईक रेट मागचा रेकॉर्ड मोडणारा असला पाहिजे याकडे आमची नजर आहे.
धारावीचे सर्व प्रश्न मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वात पूर्ण होतील. धारावीतील लोकांना त्यांच्या स्वप्नातील घर देवू. झोपडट्टीवासीयांच्या अडचणी दूर करू. झोपडपट्टी वासियांना त्यांच्या हक्काचे घर मिळेल त्यासाठी आपले सरकार प्रयत्न करेल. पुनर्विकासातील प्रकल्पग्रस्तांना भाडे मिळाले पाहिजे यासाठी सरकार प्रयत्न करेल. पुनर्विकासाचे रखडलेले प्रकल्प पूर्ण करू.. जनतेपर्यंत आपले काम घेऊन जाऊ.
मुंबई महापालिकेवर भ्रष्टाचाराचा मोठा विळखा पडला आहे. आपण भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे बाहेर काढली आहेत. मुंबईतील सामान्य लोकांचा पैसा काही लोकांच्या तिजोरीत कशाप्रकारे गेला हे आपण पाहिले आहे. हजारो कोटी अर्थसंकल्प असलेल्या मुंबईत दरवर्षी पाणी तुंबलेले आपण पाहतो. दरवर्षी तेच रस्ते आणि तेच खड्डे आपण पाहतो. अनेक शहरांमध्ये काँक्रीटचे रस्ते पूर्ण होऊन तिथे कधीच खड्डे पडत नाहीत. मुंबईत पावसाळा आला की कुलाब्यावरून बोरिवली पर्यंत जायला चार तास लागतात अशी वेस्टर्न हायवेची परिस्थिती आहे. एकेका प्रकल्पाचे काम मुंबई महापालिकेत पंधरा वर्षे चालू आहे. ते प्रकल्प नसून जुन्या लोकांची दुभती गाय आहे. अशाप्रकारे वर्षानुवर्ष हे मलई खात आहेत.
कोरोनाच्या काळात प्रेताच्या टाळूवरचे लोणी यांनी खाल्ले.कंपनी तयार करून कोट्यावधी रुपये खावून टाकले. मुंबईच्या सौंदर्यीकरण झाले पाहिजे पण आपल्या लोकांना तीच ती कामे देणे म्हणजे मुंबईतील सामान्य लोकांना धोका देण्यासारखे आहे. त्यामुळे भ्रष्टाचाराच्या विळख्यातून महानगरपालिकेला बाहेर काढावे लागेल. काही लोकांना मुंबईचे राज्य गेल्याचे दुःख होते. कारण २५ वर्षे या भरोशावर त्यांनी पोट भरले आहे. आता मुंबई मुठभर लोकांच्या हातात राहणार नाही. ती परिवाराची, घराण्याची राहणार नाही. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी जे स्वप्न पाहिले होते ते स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी आपली आहे. त्यांचं नाव सांगून जे निवडून आले त्यांनी त्यांचेच नाव धुळीस मिळवले आहे. ते इतके आत्मकेंद्रीत होते की स्वतःच्या पलीकडे ते पाहू शकले नाहीत. मुंबईकराना कधीही अशा प्रकारचे लोकं मुंबईच्या महापालिकेत निवडून आणायचे नव्हते.
मुंबईच्या बाबतीत बाळासाहेब ठाकरे यांनी जे स्वप्न पाहिले आहे ते येत्या काळात पूर्ण करायचे आहे. त्यासाठी आपल्या सगळ्यांना मेहनत घ्यावी लागेल.
