शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचा सन्मान करता की अपमान ?

0
20220818_195004

शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचा सन्मान करता की अपमान ?

मुंबई, १८ ऑगस्ट :-
येवला तालुक्यासह नाशिक जिल्ह्यात आणि राज्यातील अनेक भागात विशेषतः विदर्भ व मराठवाड्यामध्ये जुलै मध्ये ऑगस्ट च्या पहिल्या सप्ताहामध्ये अतिवृष्टी  झाल्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेले आहे.या पावसामुळे काही गावांचा संपर्क तुटलेला आहे. पावसामुळे कांदा, मका, सोयाबीन, द्राक्ष, डाळिंव , टॉमॅटो आदी पिकांचे अतोनात  नुकसान झालेले आहे, हजारो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. नुकसानीचे पंचनामे करून तातडीने मदत द्यावी अशी मागणी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी आज विधानसभेत नियम २९३ मधील चर्चेवर बोलताना केली.

ते म्हणाले की, काही ठिकाणी पिकांच्या पंचनाम्याचे कोणतेही आदेश नसल्याने मदत मिळणार की नाही याबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे.अतिवृष्टीमुळे  जिल्ह्यातील अनेक घरे आणि रस्त्यांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. सदर नुकसानीचे पंचनामे करून नुकसानग्रस्तांना जास्तीत जास्त आर्थिक मदत देण्याची मागणी आहे. उदाहरणादाखल येवला तालुक्यात कृषी विभागाच्या आकडेवारीप्रमाणे ९७ मिलीमीटर पेक्षा अधिक पाऊस होवून सुद्धा स्कायमेटच्या आकडेवारी प्रमाणे ६५ मिलीमीटर पेक्षा कमी पाऊस दाखविल्यामुळे शेतकऱ्यांना मदतीबाबत संभ्रम निर्माण झालेला आहे. त्यामुळे संततधार पावसामुळे झालेले नुकसान या निकषामधून तरी शेतकऱ्यांना जास्तीत जास्त आर्थिक मदत मिळणे आवश्यक आहे.

विधानसभेत बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेल्या आहेत. वाहून गेल्या आहेत. शेती नापिकी झाली आहे. मोठे ओढे व नाले यांचे पात्र वाढल्याने काठावरील सुपिक जमिन वाहून गेली आहे. या जमिनी पुढील काही वर्षे नापिक राहणार आहेत. यासाठी भरीव आर्थिक मदत देण्यात यावी.नगदी पिक म्हणून ओळखले जाणारे सोयाबीन पिकाचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे. विदर्भ आणि मराठवाडयामध्ये सोयाबीन या पिकाबरोबरच कापूस या पिकाचे सुध्दा मोठे क्षेत्र आहे.

अतिवृष्टीमुळे विज वितरण व्यवस्था पूर्णत: कोलमडली आहे. अनेक ठिकाणी विजेचे खांब पडले आहेत. डी.पी./ट्रान्सफार्मर नादुरुस्त झाले आहेत. त्यांची दुरुस्ती करुन उपलब्धता करुन द्यावी अशी मागणी देखील मंत्री छगन भुजबळ यांनी केली.
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी कर्जमाफी द्यावी ,हेक्टरी रु.७५ हजार मदत द्यावी, तसेच फळपिकांसाठी हेक्टरी रु.१ लाख ५० हजार तात्काळ मदत करावी.अतिवृष्टीग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करावे.विद्यार्थ्यांचे या शैक्षणिक वर्षाकरिता सरसकट शैक्षणिक  शुल्क माफ करावे.अश्या मागण्या देखील छगन भुजबळ यांनी केल्या.

अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झाल्याने शेतकऱ्यांची उभी पिके नष्ट झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडे पैसा नाही त्यांना कर्जमाफी देण्याच्या देखील विचार करण्याची गरज आहे. येवला मतदरसंघातील सन्मान योजनेतील पात्र १३०० शेतकऱ्यांना पैसे परत करण्याच्या नोटिसा देण्यात आल्या आहे. पैसे दिले नाही तर बोजा लावण्यात येईल असे आदेश काढण्यात आले आहे ही बाब अतिशय दुर्दैवी आहे. शासनाने पडताळणी करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *