… तर आजही ‘त्यांच्या’साठी मातोश्रीचे दरवाजे उघडे आहेत
… तर आजही ‘त्यांच्या’साठी मातोश्रीचे दरवाजे उघडे आहेत..
रायगड, दि. 17 ऑगस्ट :
सरकार पडत असताना हे टेबलावर नाचत होते. हे तुमचे आमदार होतील, हे नेतृत्व तुम्हाला मान्य आहे का? काय यांची वृत्ती आहे हे ओळखा. आज जे घसा फोडून सांगत आहेत बाळासाहेबांचे हिंदुत्व पुढे नेत आहेत. जरा तरी शिवसैनिक असते तर बाळासाहेबांचा मुलगा राजीनामा देत असताना तुम्ही पेढे भरवत नसता, असा घणाघाती हल्लाबोल माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी केला आहे.
शिवसेना नेते, आमदार आदित्य ठाकरे यांच्या शिव संवाद यात्रेचा तिसरा टप्प्या रायगड येथे पार पडला. आदित्य ठाकरे यांनी भाजप कार्यालयाच्या समोर शिवसैनिकांशी संवाद साधला.
आदित्य ठाकरे म्हणाले, आज ही एकच म्हणणं आहे तुमच्यावर दडपण असेल कोणी काही बोलणार नाही. जर तुम्हाला तेथे आनंदात रहायचं असेल लाज उरली असेल तर राजीनामे द्या निवडणुकीला सामोरे जा होऊन जाऊदे; जनता कुणाला कौल देईल तो मला मान्य आहे. अजून ही काहींना वाटत असेल आपण चुकलो त्यांच्यासाठी मातोश्रीचे दरवाजे उघडे आहेत, असा पुनरुच्चार आदित्य ठाकरे यांनी केला.
महाविकास आघाडी झाली तेव्हाही आपण आपली भूमिका बदलेली नाही. तिरूपती देवस्थानाला आपण महाराष्ट्रात जागा दिली. १० पुरातन मंदीरांसाठी फंड दिला. गड किल्यांसाठी फंड दिला. आपलं हिदुत्व सर्वांना पुढे घेऊन जाणारं हिदुत्व आहे. आपण शासन विकास करत होतो हे करताना कुठलाही जातीपातीचा वाद झाला नाही, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
हे लोकं महाराष्ट्राचे पाच तुकडे करतील. दंगली करतील, यांना महाराष्ट्र मागे खेचायचा आहे. मला तुमच्याकडून काही नको फक्त प्रेम आणि आशिर्वाद हवेत. ही गद्दारी शिवसेनेसोबत नाही महाराष्ट्रासोबत आणि माणुसकीसोबत केली. गद्दारीही केव्हा केली जेव्हा उद्धव ठाकरे हे रुग्णालयात होते. मी भारताबाहेरचा दौरा रद्द करणार होतो पण उद्धव ठाकरेंनी मला जायला सांगितलं. पहिल ऑपरेशन नीट झालं पण दुसरं हे क्रिटिकल होतं. त्यांना चालायला येत नव्हतं हालचाल होत नव्हती. याचवेळी हे गद्दार मुख्यमंत्री बनायची स्वप्न बघत होते; शिवसेना फोडण्याचा कट रचत होते. या गद्दारांना सर्व दिलं चांगली खाती दिली तरीही गद्दारी केली. ही गद्दारी तरुणांना संदेश आहे की चांगल्या लोकांना या राजकारणात संधी नाही हे दाखवण्यासाठी आहे. शिवसेनेला फोडा मराठी हिंदुमध्ये फूट पाडा ठाकरेंना एकटे पाडा हिच यांची इच्छा आहे, जे तुम्ही होऊ देणार नाही याची खात्री आहे, असा विश्वास आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला.
