लाल किल्ल्यावरून पंतप्रधानांचा ‘पंचप्राण’चा मंत्र!
लाल किल्ल्यावरून पंतप्रधानांचा ‘पंचप्राण’चा मंत्र!
नवी दिल्ली, दि. १५ ऑगस्ट:
अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना आगामी २५ वर्षांमध्ये भारत हा विकसित देश म्हणून ओळखला जाण्यासाठी संकल्प करा असे आवाहन करत राष्ट्रविकासासाठी ‘पंचप्राण’ ही नवी संकल्पना मांडली.

पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले की, देश यापुढे पंचप्राण आणि मोठे संकल्प घेऊन पुढे जाणार आहे. भारताची विकसित राष्ट्र म्हणून ओळख निर्माण करायची आहे. हा पहिला प्राण आहे. दुसरा प्राण गुलामीचा अंश बाहेर काढणे. तिसरा प्राण आपल्या वारशाप्रती गर्व असला पाहिजे. एक भारत श्रेष्ठ भारताच्या स्वप्नासाठी एकजुटता हा चौथा प्राण आहे. तर पाचवा प्राण नागरिकांचे कर्तव्य हे आहे.
महिलांचा सन्मान करा, मुलगा आणि मुलगी यांना समान वागणून द्यावी. देशातील भ्रष्टाचार मिटवण्यासाठी जनतेने साथ द्या. भ्रष्टाचाऱ्यांप्रती जोपर्यंत चीड निर्माण होणार नाही, तोपर्यंत देशातील भ्रष्टाचार संपणार नाही. भ्रष्टाचारविरोधी लढाई लढण्यासाठी लोकांनी साथ दिली पाहिजे असे मोदी म्हणाले. राजकारण आणि वेगवेगळ्या संस्था यातील घराणेशाहीदेखील संपवली पाहिजे, असे मोदी यांनी म्हटले.
