इंदु मिल मधील स्मारकाच्या कामाला गती देणार
इंदु मिल मधील स्मारकाच्या कामाला गती देणार
मुंबई, दि १२ ऑगस्ट ;
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदु मिल येथील स्मारकाच्या कामाला गती देऊन ते तातडीने पूर्ण व्हावे यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करू अशी ग्वाही कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली. कॅबिनेट मंत्री पदी निवड झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी दादर येथील चैत्यभूमीवर जाऊन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. त्याप्रसंगी ते बोलत होते.
मंगलप्रभात लोढा म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन खूप संघर्षमय आणि प्रेरणादायी आहे. ते कायम पक्षपात, अन्याय आणि जातिव्यवस्थेविरुद्ध लढले. त्यामुळे त्यांना समतेचे प्रतीक मानले जाते. त्यांच्या महान कार्याची सदैव आठवण राहावी, त्यांच्या कार्यापासून नव्या पिढीला प्रेरणा मिळावी, त्यांनी केलेल्या महान कार्यप्रती नतमस्तक होता यावे यासाठी इंदू मिल येथील स्मारक महत्वाचे ठरणार आहे. त्यामुळे इंदू मिलचे रखडलेले काम मार्गी लावू अशी ग्वाही मंत्री लोढा यांनी दिली.
सर्वोदय महाबोधी विहार टिळक नगर येथे जाऊन भंदत डॉ. राहुल बोधी (महाथेरो) यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. यावेळी अनुसूचित जाती मोर्चाचे अध्यक्ष शरद कांबळे, राहुल कांबळे, नागसेन कांबळे अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
