भाजपाच्या ‘हर घर तिरंगा’ इव्हेंटसाठी चीनमधून तिरंगा झेंड्यांची आयात !

0
IMG-20220810-WA0076

भाजपाच्या ‘हर घर तिरंगा’ इव्हेंटसाठी चीनमधून तिरंगा झेंड्यांची आयात !

मुंबई, दि. १० ऑगस्ट :

अत्याचारी ब्रिटिश सत्तेला हाकलून लावण्यासाठी मोठा व प्रदिर्घ लढा द्यावा लागला. काँग्रेसच्या झेंड्याखाली देश एकवटला आणि सर्वांना बरोबर घेऊन जाण्याच्या काँग्रेस विचाराने या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. या स्वातंत्र्य लढ्यात ज्यांचे काहीही योगदान नाही ते लोक आज ‘हर घर तिरंगा’ अभियानाच्या नावाखाली इव्हेंटबाजी करत आहेत. या इव्हेंटबाजीसाठी चीनमधून तिरंगा झेंड्यांची आयात करण्यात आली, हा स्वातंत्र्यसैनिकांचा व तिरंगा झेंड्याचा अपमान आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले म्हणाले.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीतर्फे राज्यातील सर्व जिल्ह्यात आझादी गौरव यात्रेचे आयोजन करण्यात आले असून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज शेगाव येथे बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटी आयोजित पदयात्रेत सहभाग घेतला यावेळी त्यांच्यासोबत आ. राजेश एकडे, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पत्रकारांशी बोलताना नाना पटोले पुढे म्हणाले की, देश स्वतंत्र झाला तेंव्हा देशात सुईचेही उत्पादन होत नव्हते पण पंडित जवाहरलाल नेहरूंच्या दूरदृष्टी नेतृत्वाखाली भारताने प्रगतीचे एक-एक शिखर गाठले व भारताला जगात राष्ट्र म्हणून उभे केले. इंदिराजी गांधी, राजीवजी गांधी यांनीही विकासाची कास धरत भारताची यशस्वी वाटचाल केली. पी. व्ही. नरसिंह राव, डॉ. मनमोहनसिंह यांनीही विकासाच्या विविध योजना देशात राबविल्या म्हणून भारत आज एक शक्तीशाली देश म्हणून उभा आहे. इंदिराजी व राजीवजींनी देशासाठी बलिदान दिले आहे. परंतु केंद्रात सत्तेवर असलेले आजचे भाजपा सरकार काँग्रेस सरकारने उभे केलेले देशाचे वैभव असलेल्या सार्वजनिक कंपन्या विकत आहे. ‘अग्निपथ’ सारखी योजना आणून तरुणांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले जात आहे. महागाई, बेरोजगारी प्रचंड वाढली आहे. किराणा मालावरही जीएसटी लावून जनतेची लूट केली जात आहे.

चीन आपल्या सीमाभागात घुसखोरी करत आहे पण ५६ इंच छातीचे पंतप्रधान त्यावर काही बोलत नाहीत. उलट चीनमधून तिरंगा झेंड्यांची आयात करून त्यांना आर्थिक लाभ कसा पोहचेल याकडे लक्ष दिले जात आहे. भाजपा हा खोटे बोलून सत्तेत आला आहे, त्यांनी जनतेची फसवणूक केली आहे. जनतेला दिलेल्या सर्व आश्वासनांचा त्यांना विसर पडला आहे. या पदयात्रेच्या माध्यमातून जनजागृती करत भाजपाचा खोटेपणा उघडा पाडण्याचे काम केले जाणार आहे, असे पटोले म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *