… म्हणून भाजपाने शिवसेना फोडली !
… म्हणून भाजपाने शिवसेना फोडली !
नवी दिल्ली, दि. १० ऑगस्ट ;
शिवसेनेतील बंडखोरीचे खापर शरद पवार व उद्धव ठाकरे यांच्यावर फोडले जात असताना या सर्व घडामोडीमागे भारतीय जनता पक्षच होता हे उघड झाले आहे. महाराष्ट्रात शिवसेनेची भाजपासोबत युती होती मात्र शिवसेनेने धोका दिल्याने त्यांना त्याचा परिणाम भोगावा लागला, असा गौप्यस्फोट बिहारचे माजी उपमुख्यमंत्री व भाजपा नेते सुशिलकुमार मोदी यांनी केला आहे.
नितीशकुमार यांच्या संदर्भात बोलताना सुशिलकुमार मोदी म्हणाले, भाजपाने कधीही आपल्या मित्रपक्षाला धोका दिलेला नाही. ज्यांनी आम्हाला धोका दिला त्यांचाच पक्ष आम्ही फोडला. राजद, काँग्रेस, जेडीयू पक्ष एकत्र आले तर लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींना पराभूत करू असा तिन्ही पक्षांचा गैरसमज आहे. पण मोदींची लोकप्रियता २०१४ व २०१९ पेक्षाही अनेकपट जास्त आहे. त्यांनी कितीही ताकद लावली तरी ते मोदींना २०२४ मध्ये पंतप्रधान बनण्यापासून रोखू शकणार नाही. आम्ही बिहारमध्ये प्रचंड बहुमताने पुन्हा सत्तेत येऊ. हे सरकार २०२५ वर्षही पूर्ण करू शकणार नाही. त्याआधीच हे सरकार कोसळेल, असा इशाराही मोदींनी दिला.
सुशील मोदी यांच्या वक्तव्यानंतर शिवसेनेनेही भाजपवर हल्लाबोल केला आहे. ‘पाठीत सुरा खुपसण्यात भाजप एक्सपर्ट आहे.’ अशी टीका शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी केली आहे. भाजप ज्या शिडीवरुन वर चढते त्याच शिडीला लाथ मारते.’ असे खासदार अरविंद सावंत यांनी म्हटले आहे.
