न्यायालयातील सुनावणीसाठी मंत्रीमंडळ विस्तार थांबलेला नाही

0
IMG-20220524-WA0052

न्यायालयातील सुनावणीसाठी मंत्रीमंडळ विस्तार थांबलेला नाही…

नवी दिल्ली, दि. 8 ऑगस्ट:
राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होईल, तुम्ही जो विचार करीत आहात, त्यापेक्षा लवकर होईल. सर्वोच्च न्यायालयाने विस्तार करू नका, असे सांगितलेले नाही. त्यामुळे सुनावणीसाठी विस्तार थांबलेला नाही असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

पत्रकारांशी बोलताना फडणवीस म्हणाले, राज्यात आज भाजपा आणि शिवसेनेची युती आहे, त्यामुळे युतीच्या सर्व उमेदवारांना निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. राज्यात अर्ध-न्यायिक प्रकरणांचे अधिकार सचिवांना गेल्या सरकारच्या काळात सुद्धा होते आणि त्यापूर्वी सुद्धा होते. त्यामुळे सचिवांकडे अधिकार दिले, असे राजकारणासाठी विरोधकांना बोलावेच लागते. राज्यात जनतेच्या हिताचे मुख्यमंत्री आणि सरकार आहे, जनतेचे प्रतिनिधीच निर्णय करतील.

विदर्भ, मराठवाडा, कोकणासाठी भावनिक भाषणे देऊन काय उपयोग, सत्तेत असताना तुम्ही काय केले, हे अधिक महत्त्वाचे असते. जनता भावनिक भाषणांना कधीच बळी पडत नाही, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी नवी दिल्ली येथे पत्रकारांशी बोलताना काही नेत्यांना लगावला.

राजकारणात कोण काय बोलते, यापेक्षा परिस्थिती काय हे अधिक महत्त्वाचे असते, त्यामुळे कोण काय बोलले, यावर उत्तर देण्यात मी वेळ वाया घालवणार नाही, असेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *