संजय राऊतांना ईडीचा डबल धक्का !
संजय राऊतांना ईडीचा डबल धक्का !
मुंबई, दि. ४ ऑगस्ट;
शिवसेना खासदार संजय राऊत यांना ईडीने डबल धक्का दिला. राऊत यांची ईडीची कोठडी आणखी चार दिवस म्हणजे ८ तारखेपर्यंत वाढवण्यात आली तर दुसरीकडे त्यांच्या पत्नी वर्षा राऊत यांनाही ईडीने समन्स बजावले असून उद्या ५ तारखेला हजर राहण्यास सांगितले आहे.
पत्राचाळ गैरव्यवहारातून संजय राऊत आणि त्यांच्या कुटुंबाला एक कोटी सहा लाख रुपये मिळाल्याचा आरोप ईडीने केला आहे. ईडीने आतापर्यंत गैरव्यवहाराच्या रकमेचा माग काढला असता एचडीआयएलकडून प्रवीण राऊत यांच्या खात्यात ११२ कोटी रुपये हस्तांतरित करण्यात आल्याचे दिसून आले होते. ही रक्कम प्रवीण राऊत यांनी त्यांचे जवळचे सहकारी, कुटुंबातील सदस्य, त्यांच्या व्यावसायिक संस्थांच्या खात्यांमध्ये वळती केली. यातील एक कोटी सहा लाख रुपये संजय राऊत यांची पत्नी वर्षां राऊत यांना देण्यात आले. त्यातील ५५ लाख रुपये २००९-२०१० मध्ये कर्जाच्या स्वरूपात वर्षा राऊत यांना मिळाले आणि त्यातून एक फ्लॅट खरेदी करण्यात आला.
राऊत यांनी अलिबाग येथील किहिम येथे १० भूखंड खरेदी केले. हे करार स्वप्ना पाटकर आणि संजय राऊत यांची पत्नी वर्षा राऊत यांच्या नावावर आहेत तसेच पत्राचाळ गैरव्यवहारातील रक्कम व्यवहारात आणण्यासाठी अवनी इन्फ्रास्ट्रक्चर स्थापन करण्यात आल्याचा आरोप आहे. पत्राचाळ व्यवहार व अलिबागमधील जमिनीचे व्यवहार हे वर्षा राऊत यांच्या नावावर झाले आहेत असा आरोप ईडीने केला आहे. ईडीने याबाबत सेशन्स कोर्टात कागदपत्रे सादर केली.
