शेतक-यांचे प्रश्न सोडून मुख्यमंत्री सत्कारात मश्गुल..

0
images (5)

शेतक-यांचे प्रश्न सोडून मुख्यमंत्री सत्कारात मश्गुल..

मुंबई, दि. २ ऑगस्ट –
विदर्भ – मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाचा दौरा केल्यानंतर इथल्या शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची तात्काळ भरपाई मिळावी अशी मागणी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत केली.

अजित पवार म्हणाले, विदर्भ, मराठवाड्यात सोयाबीनवर गोगलगायीच्या आक्रमणामुळे काही हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी दौरा केला परंतु त्यांनी केंद्रसरकारला अद्याप कळवले नाही असे दिसते त्यामुळे केंद्राची टीम पाहणी करायला आलेली नाही. विदर्भ, मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे दहा लाख हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. आता खरीप हंगाम गेला आहे. पुढे रब्बी हंगाम येईल. त्यामुळे कृषी विभागाने व सरकारने यामध्ये हस्तक्षेप करायला हवा. अतिवृष्टी भागातील काही ठिकाणी पंचनामे केलेले नाहीत. या शेतकऱ्यांना तातडीची आर्थिक मदत मिळायला हवी तिथे ती मिळालेली नाही. मात्र काही ठिकाणी मनुष्यहानी झाली तिथे ४ लाखाची मदत मिळाली आहे. परंतु ती मदत तुटपुंजी आहे त्यात वाढ व्हायला हवी. पशुधनाची भरपाई मिळालेली नाही. ती तात्काळ मिळायला हवी. अतिवृष्टी भागातील घरांचे, दुकानांचे नुकसान झाले आहे. त्यांना उभे करण्याचे आव्हान सरकारसमोर आहे तिकडे लक्ष दिले पाहिजे.

कापूस, सोयाबीनचे प्रचंड नुकसान झाले आहे. याला महत्व न देता मुख्यमंत्री स्वतःच्या सत्काराला प्रथम प्राधान्यक्रम देत आहेत. मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नाला दुसरा प्राधान्यक्रम देऊन त्याकडे दुर्लक्ष करत सत्कार घेण्यात मुख्यमंत्री मश्गुल आहेत हा असंवेदनशीलतेचा कळस आहे असा आरोपही अजित पवार यांनी केला.

मुख्यमंत्री मिरवणूका, सत्कार, सभा घेत आहेत. आता तर रात्रीच्याही सभा घेत आहेत. दहानंतर सभा घेत नाही तो एक नियम आहे हा नियम सर्वांना मान्य हवा. राज्याचा प्रमुखच नियम तोडत आहेत तर पोलीस अधीक्षक काय करणार. अक्षरशः घटना पायदळी तुडवत असतील तर काय करणार असा उद्विग्न सवालही अजित पवार यांनी केला.

राज्यात अतिवृष्टीमुळे शेतजमिनीचे एकंदरीत मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मात्र मुख्यमंत्री इतर व्यापात आहेत मार्गदर्शन आणि दर्शन घेत आहेत. चर्चा करत आहेत. मात्र त्याआधी १३ कोटी जनतेचे तुम्ही प्रतिनिधित्व करता अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे संसार उद्धवस्त झाले आहेत त्याकडे लक्ष द्या असा सल्लाही अजित पवार यांनी दिला.

मुख्यमंत्री यांच्याकडे याअगोदर अतिवृष्टी झालेल्या विदर्भ मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे. तिथे खरीप पिकांचे नुकसान झाले आहे त्यांना हेक्टरी ७५ हजार आणि फळबागांना हेक्टरी दीड लाख रुपये नुकसानभरपाई तात्काळ द्यावी. शिवाय अतिवृष्टीग्रस्त भागामधील शेतकऱ्यांच्या मुलांचे शैक्षणिक शुल्क माफ करावे अशी मागणीही अजित पवार यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *