काळ तुमच्यासोबतही निर्घृणपणाने वागू शकेल !
काळ तुमच्यासोबतही निर्घृणपणाने वागू शकेल !
मुंबई, दि. १ ऑगस्ट:
सध्याचे राजकारण घृणास्पद झालेले आहे. निर्घृणपणे वागू नका, काळ तुमच्यासोबतही निर्घृणपणाने वागू शकेल, असा सणसणीत इशारा देत शिवसेना पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांचा मला अभिमान आहे, ते शरण जाऊ शकले असते पण गेले नाहीत, असे ठणकावून सांगितले.
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी राऊत यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. शिवसेना व मी आपल्यासोबत आहे त्यांनी राऊत यांच्या आई व कुटुंबाला सांगितले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी भाजपावर सडकून टीका केली. ते म्हणाले की, संजय राऊत यांच्याबद्दल मला अभिमान आहे, ते माझे जुने मित्र आहेत. आताच मी त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन आलो. त्यांनी काय गुन्हा केला आहे. ते पत्रकार आहेत. निर्भीड आहेत. जे पटत नाही, त्यावर ते बोलतात. मरण आलं तरी पर्वा नाही पण मी शरण जाणार नाही, असे राऊत म्हणतात. त्यांचे हे वाक्य खूप महत्त्वाचे आहे. तेही शरण जाऊ शकले असते. जे तिकडे शरण गेले आहेत ते हमाममध्ये अंघोळीला गेले आहेत.जोपर्यंत सत्तेचा फेस त्यांच्याभोवती आहे, तोपर्यंत ते आमच्यावर टीका करू शकतात. जेव्हा सत्तेचा फेस निघून जाईन तेव्हा त्यांना परिस्थितीची जाणीव होईल.
विरोधात कोणी बोलला तर त्याला अडकवायचे असे सुरु आहे. बऱ्या बोलाने शरण आले तर ठीक नाहीतर कारवाई केली जात आहे. न्यायदेवतेवर आमचा विश्वास आहे. लोकशाहीचे चार स्तंभ आहेत. त्यातीलच एका स्तंभाला आता अटक झाली आहे. राजकारणाची घृणा वाटायला लागली आहे. राजकारणात दिलदारपणा पाहिजे. इतर पक्ष संपवण्याची हौस असेल तर जनतेसमोर जायला हवे. तुमचे विचार मांडा. विरोधक त्यांचे विचार मांडतील. नंतर जनतेला निर्णय घेता येईल, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
मी अडीच वर्षे मुख्यमंत्री होतो पण मुंख्यमंत्रिपदाची हवा डोक्यात जाऊ दिली नाही. मी नम्र राहण्याचा प्रयत्न करत राहिलो. ज्यांच्या डोक्यात हवा गेली आहे त्यांना मला सांगायचे आहे की निर्घृणपणे वागू नका, दिवस आणि काळ हा सर्वांसाठी नेहमी चांगलाच असतो असे नाही. भविष्यात काळ तुमच्यासोबतही निर्घृणपणाने वागू शकेल, असा इशाराही ठाकरे यांनी विरोधकांना दिला.
