अर्जुन खोतकरही एकनाथ शिंदे गटात..
अर्जुन खोतकरही एकनाथ शिंदे गटात..
मुंबई, दि. २५ जुलै:
शिवसेनेतील बंडखोरीची लागण वाढत चालली असून दोन दिवसापर्यंत उद्धव ठाकरेंबरोबरच असल्याच्या वल्गना करणारे जालन्याचे माजी आमदार अर्जुन खोतकर यांनीही एकनाथ शिंदे गटात उडी मारली आहे. दिल्लीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांच्या नेतृत्वाखाली तयार झालेल्या शिवसेना-भाजप युती सरकारला पाठींबा देत असल्याचे खोतकरांनी जाहीर केले.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे व अर्जून खोतकर यांच्यातील वाद मिटवण्यासाठी मध्यस्थी केली. एकत्र येऊन काम करण्याचेही आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोघांना केल्याचे समजते. यावेळी खासदार राहुल शेवाळे, खासदार रोहिदास लोखंडे, खासदार हेमंत पाटील, खासदार प्रतापराव जाधव, खासदार धैर्यशील माने, खासदार कृपाल तुमाने आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत हे उपस्थित होते.
खासदार प्रतापराव जाधवांची बुलडाणा जिल्हा संपर्क प्रमुखपदी पुनर्नियुक्ती
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवसेनेच्या १२ खासदारांनी देखील जाहीर पाठींबा देऊन संसदेतील आपला गटनेता बदलला होता. यानंतर उद्धव ठाकरेंनी या खासदारांवर देखील कारवाई करण्यात आली होती. नुकतीच पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत खासदार प्रतापराव जाधव यांची बुलडाणा जिल्हा संपर्क प्रमुख पदावरून हकालपट्टी करण्यात आलेली होती. परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खासदार प्रतापराव जाधव यांची पुन्हा एकदा बुलडाणा जिल्हा संपर्क प्रमुखपदी र्नियुक्ती करत असल्याचे जाहीर केले.
