राष्ट्रवादी काँग्रेसचे पुढचे लक्ष्य मुंबई महानगरपालिका !
राष्ट्रवादी काँग्रेसचे पुढचे लक्ष्य मुंबई महानगरपालिका !
मुंबई, दि. १४ जुलै :
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आगामी मुंबई महानगरपालिका हे आपले लक्ष्य ठेवले आहे. पक्षसंघटना वाढवून ती बळकट करा असे आवाहन करत मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत सक्रीय सहभाग नोंदवा असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आढावा बैठक यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे पार पडली.या बैठकीला शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, छगन भुजबळ, खासदार सुप्रियाताई सुळे, विरोधी पक्षनेते अजित पवार, एकनाथ खडसे उपस्थित होते.
या बैठकीला मार्गदर्शन करताना शरद पवार म्हणाले की, शेवटच्या कार्यकर्त्याला शक्ती देऊन त्याची प्रतिष्ठा कशी राखली जाईल, हा प्रयत्न करण्यासाठी राज्यव्यापी आणि मुंबई विभागीय कार्यकारिणीची आढावा बैठक घेण्यात आली आहे. अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आपापली मते दोन्ही दिवसाच्या बैठकीत मांडली आहेत.
मुंबईत आपला पक्ष वाढविण्यासाठी अनेक वर्षांपासून आपण प्रयत्न करतोय. पक्षनिष्ठा ठेवून काम करणारे कार्यकर्ते बोरीवलीपासून कुलाब्यापर्यंत प्रयत्न करत आहेत. राजकारणाच्या दृष्टीने महाराष्ट्रात मुंबई शहर हे अत्यंत महत्त्वाचे आहे. आपण शहरात स्वतंत्र फादर बॉडी तयार केली आहे. आपण अधिक सतर्कपणे प्रत्येक वॉर्डमध्ये पक्षाचा उमेदवार देणे गरजेचे आहे. यासाठी आपल्याला सातत्याने लोकांमध्ये जाऊन संवाद साधला पाहिजे. यासाठी सर्वांनी सोशल मीडियाचा प्रभावी वापर करावा. याद्वारे पक्षाची भूमिका प्रकर्षाने मांडण्यास मदत होईल असे स्पष्ट मत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मांडले.
मुंबई शहरात पाणी, मीटर, सांडपाण्याचा निचरा असे अनेक प्रश्न आहेत.या प्रश्नांकडे आपल्या पदाधिकाऱ्यांनी लक्ष देऊन ते सोडवण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला पाहिजे. गुरुपौर्णिमाचे निमित्ताने सर्वांनी शरद पवार यांना गुरूदक्षिणा म्हणून मुंबई शहरात आपल्या नगरसेवकांची संख्या वाढवून दाखवण्याचा निर्धार करावा असे आवाहन छगन भुजबळ यांनी पदाधिकाऱ्यांना केले.
मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांनी केलेल्या कामाची दखल संपूर्ण देशाने घेतली. नवाब मलिक यांनी केंद्र सरकारची केलेली पोलखोल अतिशय उल्लेखनीय होती. त्यांचा आवाज दाबण्यासाठी केंद्राने त्यांना निष्कारण त्रास देण्याचा डाव आखला आहे. आपण विरोधात असतो तेव्हा काम सोपे असते. सत्ताधारी हे नेहमीच नवनवीन मुद्दे देत असतात. त्यावर आवाज उठवणे आपली जबाबदारी आहे. यासाठी कोणताही मुहूर्त लागत नाही. बेरोजगारी, महागाई अशा सर्व मुद्द्यांवर लोकशाहीच्या माध्यमातून रस्त्यावर उतरून त्याविरोधात आवाज उठवा असे आवाहन खासदार सुप्रियाताई सुळे यांनी केले.
मुंबई विभागीय कार्याध्यक्षा राखी जाधव यांनी पक्षाच्या मुंबई जिल्हा व तालुकानिहाय वस्तुस्थितीचा आढावा घेत प्रत्येक वॉर्डमध्ये राजकीय परिस्थिती वेगवेगळी आहे. यात नवीन सहकारी एखाद्या वॉर्डमध्ये निवडणूक लढणार असेल तर त्यांना योग्य ते सहकार्य पक्षाच्यावतीने मिळावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
या बैठकीला पक्षाचे कोषाध्यक्ष हेमंत टकले, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, महिला प्रदेशाध्यक्षा विद्याताई चव्हाण, माजी खासदार माजीद मेमन, राष्ट्रीय सचिव नरेंद्र वर्मा, मुंबई विभागीय कार्याध्यक्ष नरेंद्र राणे, मुंबई विभागीय महिलाध्यक्षा सुरेखा पेडणेकर, मुंबई विभागीय युवक अध्यक्ष निलेश भोसले, मुंबई विभागीय सामाजिक न्याय सेल अध्यक्ष सुनील शिंदे, मुंबई विभागीय अल्पसंख्याक अध्यक्ष सोहेल सुभेदार, दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष विजय वाडकर, दक्षिण मध्य मुंबई जिल्हाध्यक्ष रमेश परब, उत्तर मुंबई जिल्हाध्यक्ष धनंजय पिसाळ आदींसह पक्षाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.
