शेतकऱ्यांच्या थकीत कृषिपंपाचा अनुशेष ६ महिन्यात दूर करा
शेतकऱ्यांच्या थकीत कृषिपंपाचा अनुशेष ६ महिन्यात दूर करा…
मुंबई, दि. १३ जुलै:
राज्यातील शेतकऱ्यांना थकीत कृषिपंपाचा मार्च २०२२ पर्यंतचा अनुशेष दूर करण्यात यावा आणि कृषिपंपाचा अनुशेष दूर करताना सौर ऊर्जेला प्राधान्य देत मार्च २०२२ पर्यंतचे संपूर्ण उद्दिष्ट पुढच्या ६ महिन्यात पूर्ण करा. यासाठी केंद्र सरकारची ‘कुसुम’ योजना आणि राज्य सरकारची योजना अशा दोन्ही योजनांचा वापर करीत अधिकाधिक शेतकऱ्यांना लाभ मिळवून द्यावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी या उद्देशाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या घोषणेनुसार राज्यात २०१८ मध्ये सुरु करण्यात आलेल्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेत मुंबई येथे झालेल्या बैठकीत आढावा घेण्यात आला. माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मुख्य सचिव तसेच विविध विभागांचे सचिव, वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, राज्यात विजेचे देयक न भरल्याने पथदिवे आणि पाणीपुरवठा योजनांची वीज बंद आहे. याची जुनी थकबाकी टप्प्याटप्प्याने शासनामार्फत भरण्यासाठी प्रस्ताव तयार करा आणि वीजपुरवठा तत्काळ पूर्ववत करावा. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना: विकेंद्रित सौर निर्मितीतून 4500 MW वीज निर्मितीचे उद्दिष्ट या योजनेत आहे. अशा प्रकल्पांसाठी तातडीने जागा उपलब्ध करून देण्यात याव्यात आणि गतीने ही योजना कार्यान्वित करावी. किमान 30 टक्के फिडर यावर्षी सौर उर्जेवर जातील, या दृष्टीने तत्काळ नियोजन करण्यात यावे आणि त्यादृष्टीने पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात. महावितरणनेसुद्धा स्वनिर्मितीचे जिल्हाश: उद्दिष्ट निश्चित करावे. याशिवाय उपसा सिंचन योजना सुद्धा सौर उर्जेवर आणण्यासाठी तातडीने पाऊले उचलावीत.
