उद्धव ठाकरेंचा पाठिंबा भाजपाच्या द्रौपदी मूर्मूंना..
उद्धव ठाकरेंचा पाठिंबा भाजपाच्या द्रौपदी मूर्मूंना..
मुंबई, दि. १२ जुलै:
भारतीय जनता पक्षाने दगाफटका करुन शिवसेना फोडून उद्धव ठाकरेंना अडचणीत आणले असताना राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे काय भूमिका घेताता याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. उद्धव ठाकरे अजूनही महाविकास आघाडीचा घटक आहेत असं असताना त्यांनी एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मूर्मू यांना पाठिंबा जाहीर केला आहे.
शिवसेनेच्या काही खासदारांनी द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा द्यावा, अशी मागणी देखील केली होती. त्यामुळे ठाकरेंनी हा निर्णय दबावाखाली घेतला का अशी चर्चा सुरु आहे. शिवसेना भवन येथे पाठिंबा जाहीर करताना उद्धव ठाकरे म्हणाले, गेल्या ४-५ दिवसांत आदिवासी आणि त्या समाजात काम करणाऱ्या शिवसैनिकांनी विनंती केली आहे. त्यात एकलव्य संघटनेचे शिवाजीराव ढवळे, अमशा पडवी, निर्मला गावित, पालघरच्या जि.प. अध्यक्षा आल्या होत्या. एसटी-एससी समाजातल्या लोकांनी विनंती केली आहे की पहिल्यांदा आदिवासी समाजातल्या व्यक्तीला राष्ट्रप्रमुख बनण्याची संधी मिळत आहे. त्यामुळे आपण त्यांना पाठिंबा दिला तर आम्हाला त्याचा आनंद होईल. या सगळ्यांचा मान ठेवून शिवसेना द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देत आहे.
राष्ट्रपतीपदाची निवडणूक समोर आली आहे. मी मुद्दाम स्वत: तुमच्यासमोर बसलोय कारण काही बातम्या विचित्रपणे तुमच्यापर्यंत आल्या आहेत. एक स्पष्टपणे सांगतो की खासदारांच्या बैठकीत कुणीही माझ्यावर दबाव आणला नाही. सगळ्यांनी निर्णय माझ्यावर सोपवला आहे. आजही मातोश्रीवर रीघ लागली आहे. त्यात मी गेल्या निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवारांना बोलवून त्यांच्याशी चर्चा केली आहे. खासदारांसोबतही चर्चा केली आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
पाठिंबा देण्यामागे कुणाचाही दबाव नाही हे मी पुन्हा सांगतो. सध्याच्या राजकीय परिस्थितीत मी विरोध करायला हवा होता पण शिवसेनेने राष्ट्रपतीपदासाठी कधीच कोत्या मनाने विचार केलेला नाही. प्रतिभाताईंना देखील शिवसेनाप्रमुखांनी पक्षाच्यापलीकडे जाऊन पाठिंबा दिला होता. प्रणव मुखर्जींनाही पाठिंबा दिला होता. त्यालाच अनुसरून मी लोकांनी केलेल्या आग्रहाचा आदर करून द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देत असल्याचे जाहीर करतो, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
