विलासराव देशमुख सदैव स्मरणात राहतील!
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आदरांजली.
मुंबई, दि. १४ ऑगस्ट
हसतमुख, दिलदार, लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून ते सदैव स्मरणात राहतील अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्या स्मृतीदिनानिमित्त अभिवादन करुन आदरांजली वाहिली.
राज्याचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख साहेब सर्वांना सोबत घेऊन पुढे जाणारे दूरदृष्टीचे नेते होते. संकटांवर मात करुन यशस्वी होण्याचे कौशल्य त्यांच्याकडे होते. लोकांच्या भल्यासाठी चाकोरीबाहेरचे निर्णय घेण्याचे साहस त्यांनी अनेकदा दाखवले. अमोघ वक्तृत्व आणि हजरजबाबीपणाच्या बळावर त्यांनी विरोधकांना नामोहरम केले परंतु कुणाचा अवमान, अनादर कधी केला नाही असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले.
स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्याबद्दलच्या आठवणींना उजाळा देतांना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, महाराष्ट्राची आणि इथल्या राजकारणाची उंची वाढवण्याचे काम स्वर्गीय देशमुख साहेबांनी केले. राजकारणात वैचारिक विरोध केला, परंतु वैयक्तिक मैत्री कायम जपली. स्वकर्तृत्वावर मोठे झालेले ते नेते होते असेही अजित पवार म्हणाले.
युवकांच्या क्षमतेवर त्यांचा विश्वास होता. त्यांनी नेतृत्वाची नवी पिढी निर्माण केली. युवकांच्या हातात महाराष्ट्राचे भविष्य उज्वल आहे, असे मानणारे ते नेते होते. महाराष्ट्राच्या जडणघडणीतले त्यांचे योगदान खुप मोठे आहे, त्यासाठी ते सदैव स्मरणात राहतील. त्यांना कृतज्ञतापूर्वक अभिवादन करतो अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वर्गीय विलासराव देशमुख यांचे स्मरण केले.
