नगरपालिका व नगरपरिषदांच्या निवडणुका पावसाळ्यानंतर ?
नगरपालिका व नगरपरिषदांच्या निवडणुका पावसाळ्यानंतर ?
नवी दिल्ली, दि. ९ जुलै:
नगरपालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्याने सर्वच राजकीय पक्षांचा दबाव वाढला असून एकीकडे ओबीसी आरक्षणाचा पेच तर दुसरीकडे पावसाळा असं संकट आहे. राज्य सरकारवर दबाव वाढत असल्याने ओबीसी आरक्षणासहितच निवडणूक व्हावी ही राज्य सरकारची भूमिका आहे. तसेच पावसाळ्यात निवडणूक घेण्यात अडचणी येतात म्हणून नगरपरिषदांची निवडणूक पुढे ढकलण्याबाबत आयोगाशी चर्चा करु, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.
दिल्लीत पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, निवडणूक ओबीसी आरक्षासहितच व्हावी ही आमचीही इच्छा आहे. त्यासाठी आम्ही निवडणूक आयोगाकडे जाणार आहोत. ओबीसी आरक्षणाबाबत तुषार मेहता यांचीही दिल्लीमध्ये भेट घेतली आहे.
महाराष्ट्रातील १७ जिल्ह्यामधील ९२ नगरपरिषदांची निवडणूक जाहीर झाली असून ही निवडणूक ओबीसी आरक्षणाशिवाय होणार असल्याने सर्वच पक्षाला त्याला विरोध आहे. त्यामुळे नगरपालिकांच्या निवडणुका तीन चार महिने पुढे ढकलल्या जाण्याची शक्यता आहे.
राज्यातील 92 नगर परिषदा आणि चार नगर पंचायती मधील सार्वत्रिक निवडणूका जाहीर करण्यात आल्या आहेत. 18 ऑगस्ट रोजी मतदान होणार असून 19 ऑगस्टला मतमोजणी होणार आहे. या निवडणूकीची प्रक्रीया 20 जुलैपासून सुरु होणार आहे. 20 जून रोजी जिल्हाधिकारी निवडणूक कार्यक्रम जाहिर करणार असून 22 ते 28 जुलैपर्यंत राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या संकेतस्थळावर नामनिर्देशनपत्र भरायची आहेत.
पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, अमरावती आणि बुलढाणा या 17 जिल्ह्यातील 92 नगरपरिषदा आणि चार नगर पंचायतीमध्ये निवडणुका होणार आहेत.
