उठाव तुमचा आणि बंदुक मात्र आमच्या खांद्यावर , हे वाईट !!

0
IMG-20220705-WA0007

उठाव तुमचा आणि बंदुक मात्र आमच्या खांद्यावर , हे वाईट !!

मुंबई, दि. 4 जुलै :
एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील नव्या सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला. या विश्वासदर्शक ठरावावर भाषण करताना काँग्रेस नेते व माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी बंडखोर शिवसेना आमदारांवर घणाघाती हल्लाबोल केला.

बाळासाहेब थोरात म्हणाले , मी खूप सरकारं पाहिली.. एक पक्षाचं सरकार असलं तरीही अडचणी असतात, तक्रारी असतात, आमदारांच्या कुरबुरी असतात… कामासाठी दबाब असतो पण या सर्व तक्रारी आम्ही संयमानं हाताळल्या..आम्ही टोकाची भूमिका कधी घेतली नाही.. तुम्ही जो बदल केला म्हणता याची इतिहास नोंद घेत असतो…तुम्ही सुरतला गेला, गुवाहाटीला गेला नंतर गोव्याला गेला… या तुमच्या बदलाच्या काळात तुम्ही बंदुक मात्र आमच्या खांद्यावर ठेवली याचं आम्हाला वाईट वाटलं…तुम्ही आमच्या खांद्यावर बंदुक ठेवायला नको होती.

हे सरकार कसे आले हे जनतेला सर्व माहिती आहे… आता तुम्ही सत्तेवर आले..लगेच आरे कारशेडचा निर्णय घेतला त्यावर काही आक्षेप आहेत…पर्यावरणवाद्यांचा विरोध आहे त्याचा विचार करावा लागेल. सत्तेचा आनंद असतो…पण त्याचबरोबर जबाबदारीही असते हे विसरू नका.

मा. देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री झाले आहेत… ते सतत मी येणार, मी येणार, असे म्हणत होते ते आले पण असे येतील असं वाटलं नव्हतं..निवडणूक प्रचारावेळीही देवेंद्र फडणवीसजी जोशात मी येणार, मी येणार, असे म्हणत होते पण कोल्हापुरच्या सभेत मीच म्हणालो होतो…तुम्हाला विरोधी पक्षनेता म्हणून यायचे असेल तर आरशात पहा..

देवेंद्रजी, तुम्ही पाच वर्ष मुख्यमंत्री म्हणून चांगलं काम केलं पण तुमचं हे चांगलं कामच तुम्हाला अडचणीत आणतंय असं मला वाटतं, दिल्लीवाले काळजी करतात काय तुमची?

महाराष्ट्राला एक चांगली संस्कृती, परंपरा आहे पण मागील काही वर्षात कोणीही उठतो आणि काहीही बोलतो. जेष्ठ नेते मग ते कोणत्याही पक्षाचे असोत त्यांना आदराचं स्थान दिलं पाहिजे, काहीही बोललं जातं ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. तुम्ही आम्ही सर्वांची ही जबाबादारी आहे की, यापुढे अशा प्रकारची वक्तव्ये होणार नाहीत.

महाविकास आघाडीचे सरकार आले आणि सर्वात प्रथम आम्ही शेतकऱ्यांचं सरसकट दोन लाख रुपयांचं कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला. कोरोना महामारीचे संकट हे जागतिक संकट होते पण या संकटाच्या काळात मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह आम्ही सर्वजण काम करत होतो. संपूर्ण प्रशासन काम करत होतं. कोरोना संकटात मुंबईतील परिस्थिती आम्ही जशी हाताळली त्याचं जागतिक पातळीवर कौतुक झालं. धारावीसुद्धा आम्ही कोरोनामुक्त केलं, हे कोणालाही नाकारता येणार नाही.

अतिवृष्टी झाली, कोकणात चक्रीवादळ आलं…या सर्व संकटात शासन व प्रशासन भक्कमपणे उभं राहिलं व लोकांना मदत पोहचली. कोरोनाच्या दोन वर्षांच्या संकटात आर्थिक स्रोत कमी होत तरीही विकास कामं थांबवली नाहीत, मेट्रो, कोस्टल रोड, ट्रान्स हार्बर, समृद्धी महामार्ग, नवी मुंबई विमानतळ…कोणतंही काम थांबवलं नाही..त्याला गती देण्याचं काम केलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *