शिंदे-फडणवीस सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला
शिंदे-फडणवीस सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला….
मुंबई, दि. ४ जुलै:
राज्यात आलेल्या नव्या शिंदे-फडणवीस सरकारने विश्वासदर्शक ठरावही जिंकला आहे. शिंदे गट आणि भाजपाने १६४ मते मिळवत विश्वासदर्शक ठराव जिंकला तर महाविकास आघाडीला ९९ मतं मिळाली, तीन आमदार तटस्थ राहिले.
विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी एकनाथ शिंदे सरकारकडून विश्वासदर्शक मांडण्यात आला. सुधीर मुनगंटीवार यांनी विश्वासदर्शक ठराव मांडला आणि त्याला भरत गोगावले यांनी अनुमोदन दिलं. सुरुवातीला आवाजी मतदान झाल्यानंतर प्रत्यक्ष मतमोजणी कऱण्यात आली. यावेळी भाजपा-शिंदे सरकारने बहुमताचा आकडा पार केला आणि विश्वासदर्शक ठराव जिंकला.
विश्वासदर्शक ठरावावेळी काँग्रेसचे दहा आमदार गैरहजर होते. यात माजी मंत्री अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार, झिशान सिद्दीकी, धीरज देशमुख, प्रणिती शिंदे, जितेश अंतापुरकर, कुणाल पाटील, राजू आवळे, मोहन हंबर्डे, शिरीष चौधरी. जितेश अंतापूरकर यांचे लग्न असल्याने अनुपस्थित होते तर प्रणिती शिंदे या परदेशी आहेत. राज्यात १० दिवसांच्या राजकीय नाट्यानंतर राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार जाऊन शिंदे-भाजपा सरकार आले.
