महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका लागणार, कामाला लागा
महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका लागणार, कामाला लागा…
मुंबई, दि. ४ जुलै:
शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस महाविकास आघाडीचे सरकार कोसळून बंडखोर शिवसेना व भाजपाचे सरकार सत्तेतवर आले आहे. हे पण सरकार जास्त काळ टिकणार नाही, सहा महिन्यात सरकार कोसळू शकते. त्यामुळे मध्यावधी निवडणुकीच्या तयारीला लागा, अशा सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी आमदारांना दिल्या.
शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक यशवंतराव चव्हाण सेंटर येथे झाली. यावेळी बोलताना पवार म्हणाले की, “अडीच वर्ष उत्तमपणे कारभार चालवल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे आपलं सरकार पडलं. त्यांचं सरकार चार ते सहा महिन्यात पडेल. त्यांचं सरकार जास्त काळ टिकू शकणार नाही. त्यामुळे आपण सगळ्यांनी मध्यावधी निवडणुकीसाठी तयार राहिलं पाहिजे. आपल्या आमदारांची त्यादृष्टीने तयारी आवश्यक आहे”
सगळ्या आमदारांनी आपापल्या मतदारसंघात जास्तीत जास्त वेळ द्यायला हवा. शिंदे सरकारमध्ये नाराजांची फौज मोठी आहे. मंत्रिमंडळ विस्तारानंतर ही नाराजी उघडपणे समोर येईल. त्यामुळे बंडखोर आमदार स्वगृही परतण्याची शक्यता आहे. सरकार पडले तर मध्यावधी निवडणुका लागतील. त्यामुळे निवडणुकीच्या तयारीला आत्तापासून सुरुवात करा.
